ऊसतोडीसाठी सुरू असलेल्या ‘लुटी’ने शेतकरी हतबल, चिटबॉयसह ट्रॅक्टरचालकाला ‘अर्थपूर्ण’ महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टी, अवकाळीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यापुढे आता 18 महिन्यांनंतरही शेतात उभ्या असलेल्या उसाची चिंता भेडसावत आहे. उसाचे वजन घटण्याचा प्रश्न समोर असतानाच तोडीसाठी होणाऱया आर्थिक लुटीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊसतोडीसाठी कारखान्याचा चिटबॉय, ऊसतोड कामगार आणि ट्रॅक्टरचालक यांनाही ‘अर्थपूर्ण’ महत्त्व प्राप्त झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱयांकडून ऊस पेटविण्याचा मार्ग अवलंबला जात आहे.

यंदा पाऊसमान चांगले झाल्याने आणि उजनी धरणातील पाण्याची उपलब्धता लाभल्यामुळे रब्बी पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिह्यातील शेतकऱ्यांचा कल नगदी पिके घेण्याकडे वाढला आहे. प्रत्येक शेतकरी उसाकडे शाश्वत पीक म्हणून पाहत आहे. मात्र, जिवापाड जपलेला हा ऊस 18 महिन्यांनंतरही शेतातच उभा असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. उसाला आज तोड येईल, उद्या तोड येईल, या आशेवर पाणी देऊन ऊस जगविण्याची धडपड सुरू आहे. 18 महिन्यांनंतर उसाला तुरे लागून वजन घटून आर्थिक भार सोसावा लागत आहे. वेळेत गाळप न झाल्यास उत्पादन कमी येण्याची चिंताही आहेच.

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा गाळप हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू झाला. गेल्या चार महिन्यांत माढा तालुक्यातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून 23 ते 24 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर, अजूनही जवळपास 8 ते 10 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शेतात उभा आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक शेतकऱयाने केलेली उसाची लागवड आणि कारखान्यांनी क्षेत्राबाहेरील उसाला दिलेले प्राधान्य हेच सांगता येईल. शेतात उभा असलेला ऊस आता कळीचा मुद्दा बनत चालला आहे.

शेतात उभा असलेला ऊस गाळपासाठी कारखान्याकडे घालविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत आहे. बऱ्याचशा कारखान्यांचा गाळप हंगाम संपत चालल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच उसाला तोडणी येण्यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली पळापळ पाहून त्याची आर्थिक लूट सुरू आहे. फेबुवारी महिन्याच्या शेवटापासून ऊसतोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून चढय़ा दराची मागणी करण्यात येत आहे. यामध्ये कारखान्याच्या चिटबॉयला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे. ऊसतोडीसाठी फडात टोळी पाठविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत आहे. ऊसतोडीसाठी एकरी 7 ते 10 हजार रुपयांची मागणी करण्यात येत आहे. ट्रॅक्टर आणि ट्रॅकचालकही प्रत्येक खेपेला 500 ते 1000 रुपयांची मागणी करतात. आता मार्च महिना जसजसा संपत आहे, तसतसा तोडणी कामगार ऊसतोडीसाठी मनाला वाट्टेल ते दर सांगतात. एकीकडे शेतात उभा असलेला ऊस आणि तोडीसाठी मागण्यात येणाऱ्या अवास्तव पैशांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

माढा तालुका कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 जानेवारीपर्यंत तालुक्यात नवीन उसाची लागवड 3047 हेक्टरवर झाली आहे. तर, आडसाली 6274 हेक्टर, पूर्वहंगाम 3950 हेक्टर आणि खोडवा 5952 हेक्टर अशा एकूण 19,224 हेक्टरवर ऊस उभा आहे.