भाजपकडून सूडभावनेतून कारवाई, तपास यंत्रणांचा गैरवापर; संजय राऊत यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपची सत्ता गेलेल्या राज्यात सूडभावनेतून केंद्र सरकारकडून कारवाई होत आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र या राज्यात तपास यंत्रणाकडून अशा कारवाया वाढल्या आहेत. बेबंद हुकूमशाहीची ही सुरुवात आहे, असा आरोप शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर त्याची तयारी करा, आम्ही तरुंगात जायला तयार आहोत. मात्र, स्वातंत्र्यासाठी आमचा लढा सुरू राहील. केंद्राच्या दबावासमोर आम्ही कधीही झुकणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. तपास यंत्रणांचा गैरवापर देशहितसासाठी योग्य नाही. श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत ते बोलत होते.

आता अनेक वर्षे जुनी प्रकरणे बाहरे काढून तपास यंत्रणांकडून त्रास देण्यात येत आहेत. त्यामुळे या राजकीय सूडाच्या कारवाया आहेत. खोटी प्रकरणे, खोटी कागदपत्रे, खोटे साक्षीदार असे सध्या सूडाच्या राजकारणात होत आहेत. सध्या केंद्रीय यंत्रणा आपले सत्व गमावत आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले. अनेक महत्त्वाची प्रकरणे असतानाही फक्त पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला लक्ष्य करण्यात येत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा करता येत नसल्याचेही ते म्हणाले.