‘पराभव दिसला की निवडणुका पुढे ढकलतात, हिंमत असेल तर…’ अरविंद केजरीवाल यांचं भाजपला खुलं आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली महानगरपालिका एकीकरणावर (एमसीडी एकीकरण) भाजपला खुले आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर वेळेवर एमसीडी निवडणुका दाखवा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

शहीद दिनानिमित्त अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘गेल्या काही दिवसांपासून जे काही दिसत आहे तो एक प्रकारे शहिदांच्या बलिदानाचा अपमान आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार दिल्लीतील महापालिका निवडणुका पुढे ढकलत आहे. यावेळी भाजप पूर्ण साफ होणार होता हे सर्वांना माहित आहे आणि आपला पराभव टाळण्यासाठी त्यांनी आधी राज्य निवडणूक आयोगावर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी दबाव आणला आणि आता दुरुस्त्या आणत आहेत, ज्याद्वारे निवडणूक अनेक महिने पुढे ढकलली जात आहे. हे खूप दुःखद आहे.’

केंद्र सरकारला आवाहन करत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘जय पराजय हा होतच राहतो, आज तुम्ही कोणत्या राज्यात जिंकत आहात, तर कुठल्यातरी राज्यात दुसरा कोणी जिंकत आहे. छोट्या एमसीडीच्या निवडणुकीत आपला पराभव टाळण्यासाठी या देशाशी खेळू नका, हुतात्म्यांच्या हौतात्म्याशी खेळू नका, संविधानाशी खेळू नका.’

भाजप छोट्या पक्षाला घाबरते: केजरीवाल

भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, ‘आज तीन महापालिका एकत्र करायच्या आहेत, म्हणून आम्ही निवडणुका पुढे ढकलत आहोत. या आधारावर निवडणुका पुढे ढकलता येतील का? उद्या गुजरातमध्ये निवडणुका आहेत आणि ते केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहतील की आम्ही गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र करणार आहोत, त्यामुळे गुजरातमध्ये निवडणुका घेऊ नका. पुढच्या वेळी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा पराभव होत आहे, तेव्हा आम्ही संसदीय व्यवस्था रद्द करून अध्यक्षीय पद्धत आणणार आहोत, निवडणुका घेऊ नका, असे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला देतील.’

अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी पंतप्रधानांना हात जोडून आवाहन करतो की उद्या भाजपा असो वा आम आदमी पार्टी, मोदीजी असो वा केजरीवाल असो, या देशाचा उद्धार झाला पाहिजे. छोटी निवडणूक जिंकण्यासाठी तुम्ही या देशाच्या व्यवस्थेशी खेळत आहात. हे अजिबात मान्य नाही.

‘भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, सर्वात मोठा पक्ष दिल्लीत एका छोट्या पक्षाला घाबरला. दिल्लीतल्या छोट्याशा निवडणुकीने घाबरलेल्या, तुमच्या आत काय हिंमत आहे, ते दिसलं. मी भाजपला आव्हान देतो, तुमच्यात हिम्मत असेल तर वेळेवर एमसीडी निवडणुका दाखवा आणि जिंकून दाखवा, आम्ही राजकारण सोडू’, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी, माध्यमांशी संवाद साधताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज शहीद दिन आहे. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आज फाशी देण्यात आली. देशाला स्वतंत्र करण्यासाठी तिघांनीही बलिदान दिले होते. देश स्वतंत्र झाला, राज्यघटना झाली, जनतेने आपले सरकार निवडावे आणि त्या सरकारने जनतेची स्वप्ने पूर्ण करावीत, असे संविधानात जनतेला पूर्ण अधिकार दिले गेले.