
शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा आणि विदर्भात शिवसंपर्क अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेच राज्यातील सर्व खासदार जिल्ह्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात आढावा घेण्यासाठी फिरत आहेत. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक नेमण्यात आला असून पंचायत समिती गणापर्यंत जाऊन माहिती घेण्यात येत आहे. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठीच हे अभियान आहे. आगामी काळात शिवसेनेचा झंझावात दिसून येईल, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी केले.
येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख शिवाजी माने, बालाजी रेड्डी, महिला आघाडी जिल्हा संघटक डॉ. शोभा बेंजरगे, सुनिता चाळक, युवती सेना जिल्हाधिकारी अॅड. तेजस्वीनी जाधव, युवासेना जिल्हा युवा अधिकारी अॅड. राहुल मातोळकर, कुलदिप सूर्यवंशी, माजी जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, नामदेव चाळक यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या खासदारांना प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हे अभियान राबवण्यास सांगण्यात आले आहे. पंचायत समितीच्या गणापर्यंत जाऊन माहिती घेण्याचे काम करण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक समन्वयक देण्यात आला आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आपण एक स्वतंत्र अहवाल पक्षाकडे सोपवू, असे त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघामध्ये यापुर्वी शिवसेनेचा विजय झालेला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. शिवसेनेची पाळेमुळे मजबूत करण्यासाठी, मजबूत पक्ष संघटना उभी करण्यासाठी पक्ष वाढीसाठी हे शिवसंपर्क अभियान आहे.
शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाकडून काय अपेक्षीत आहे. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत. स्थानिक पातळीवरचे काय प्रश्न आहेत. जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांची भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहचवण्यासाठी हे शिवसंपर्क अभियान आहे, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेना स्वबळावर किंवा आघाडीमधून लढेल हा निर्णय पक्षप्रमुख त्या त्या वेळी घेतील. शिवसंपर्क अभियानामधील अहवालावरुन जिल्ह्यातील पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचेही शिवसेना खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.






























































