
होळीनंतर ठाण्यात पुन्हा पारा तडकला असून नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. आज 44.1 एवढे तापमान होते. त्यामुळे ठाणेकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. एसी, पंखे, कुलर हायमोडवर गेले. सरबत, उसाचा रस, आईस्क्रीम, कलिंगड विक्रेत्यांकडे अनेकांची पावले वळत होती. दिवसेंदिवस तापमान वाढत चालल्याने मे महिन्यात काय होईल या विचारानेच अनेकजण घामाघूम झाले आहेत.
हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही 14 ते 16 मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा 35 अंशाच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास 40 अंशाच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे. 16 मार्च रोजी ठाण्याचे तापमान हे 44 अंशावर पोहोचले होते. त्यानंतर ते तापमान कमी होईल असे वाढत असताना दुसऱ्याच दिवशी 17 मार्चल 45.6 अंशावर गेले होते. हे आतापर्यंत ठाण्यातील सर्वाधिक तापमान असल्याचे सांगण्यात येते.
या तापमानाची तुलना विदर्भाशी केली गेली. 19 ते 22 मार्च दरम्यानचे तापमान 35 ते 40 च्या आसपास होते. मात्र त्यातच बुधवारी अचानक तापमान 44.1 अंशावर गेल्याचे पाहण्यास मिळाले. ठाणेकरांना हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. हे तापमान असेच राहिल्यास एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जीव नकोसा होईल अशी भीता निर्माण झाली आहे.
तापमानाचा तक्ता
तारीख तापमान
१६ मार्च २०२२ ४४
१७ मार्च २०२२ ४५.६
१८ मार्च २०२२ ४३.२
१९ मार्च २०२२ ३९.९
२० मार्च २०२२ ३५.२
२१ मार्च २०२२ ३९.४
२२ मार्च २०२२ ३७.६
२३ मार्च २०२२ ४४.१























































