
एसी लोकलच्या रिकाम्या जाणाऱया फेऱया हे आजवरचे चित्र आता हळूहळू बदलत असून आता कल्याणवरून सकाळी सुटणाऱया एसी लोकलला डोंबिवलीकरांना जागा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य रेल्वेवर बदललेल्या वेळापत्रकात एसी लोकलच्या फेऱया वाढल्यानंतर आता दर सोमवारचा प्रवाशांचा आकडा वाढतच चालला आहे; परंतु एसी लोकलच्या समावेशामुळे मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक गेले काही दिवस चांगलेच कोलमडले असून लोकल अर्धा तास उशिराने धावत असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
मध्य रेल्वेचे ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर नव्या वेळापत्रकात 34 एसी लोकलच्या फेऱया वाढविल्या आहेत. तर सीएसएमटी ते पनवेल-गोरेगाव हार्बर मार्ग, सीएसएमटी ते कल्याण मुख्य मार्ग अशा एकूण 60 एसी लोकलच्या फेऱया चालविण्यात येत असल्याने त्यातील काही फेऱया बदलापूरपर्यंत वाढविल्याने सकाळच्या पिकअवरमधील फेऱयाना मोठी गर्दी होत आहे. सकाळी 8.54 वाजताच्या कल्याण ते सीएसएमटी एसी लोकलच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे.
दरवाजे उघड–बंद होण्यास वेळ लागतोय
18 फेब्रुवारीला ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका सक्रिय झाल्याने लोकमान्य टिळक टर्मिनस येथील लांब पल्ल्याच्या गाडय़ांना स्वतंत्र मार्गिका मिळाली आहे. नव्या मार्गिका कार्यरत झाल्यानंतर सुरुवातीला रूळ स्थिरस्थावर होईपर्यंत लोकलच्या वेगावर निर्बंध घालण्यात आले होते. आता एक महिन्यानंतर तरी लोकलचे वेळापत्रक रुळांवर येईल ही अपेक्षा फोल ठरली आहे. एसी लोकलच्या स्वयंचलित दरवाजांना उघडझाप होण्यास वेळ लागत असल्याने या लोकल फलाटांवर इतर लोकलपेक्षा जादा वेळ थांबा घेत असल्याने साध्या लोकलच्या फेऱयांना फटका बसत असल्याचे म्हटले जात आहे.
60 एसी फेऱयांचे सोमवारी वाढलेले आकडे
दिनांक तिकीट प्रवासी महसूल
- 7 मार्च 1138 22,558 8,76,505
- 14 मार्च 1450 24,133 9,92,281
- 21 मार्च 1762 33,718 13,48,199



























































