
दूरस्थ शिक्षण विभागाच्या (आयडॉल) कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नवीन अभ्यासक्रमांची वानवा, प्राध्यापकांची अपुरी संख्या, परीक्षा केंद्रांची कमतरता अशा नानाविध समस्या असताना आता आयडॉलच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमांच्या पुस्तकांशिवायच परीक्षांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे आयडॉलकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून युवासेनेच्या वतीने वारंवार स्थगन प्रस्तावाद्वारे आयडॉलचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे, मात्र आतापर्यंत विद्यापीठाने कोणतीच कार्यवाही केलेली नाही. आयडॉलच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका एमए (इतिहास)च्या विद्यार्थ्यांना बसला आहे. येत्या 29 मार्चला एमए (इतिहास)ची परीक्षा होणार आहे. मात्र अद्याप बहुसंख्य विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत. पुस्तकांच्या शोधापायी दररोज अनेक नोकरदार विद्यार्थी सुट्टी घेऊन विद्यापीठाच्या चकरा मारत आहेत. या विद्यार्थ्यांची विद्यापीठाने तातडीने दखल घेऊन त्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी केली आहे.



























































