पुण्यातील प्रकरणाची एटीएसमार्फत चौकशी, दिलीप वळसे-पाटील यांची घोषणा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात एका टोळीकडून दहशतवाद्यांना पैशांचा पुरवठा होत असल्याच्या प्रकरणाची चौकशी  कोणाच्याही दबावाखाली  थांबवली  नाही. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा वर्षभर तपास केला. पण हाती काही लागले नाही, असे स्पष्ट करत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा एटीएसकडे देण्याची घोषणा आज विधानसभेत केली.

विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात गृहखात्यावर आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना वळसे-पाटील यांनी विरोधी पक्षाला टोले लगावले. ऍण्टेलिया स्फोटकांच्या प्रकरणी एटीएस खऱया आरोपींपर्यंत पोहचत असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा तपास आपल्या हातात घेतला. आता या तपासाचे  पुढे काय झाले याची अजून माहिती नाही. या प्रकरणात ज्यांनी पुढाकार घेतला ते बाहेर निर्धास्तपणे फिरत आहेत, असे सांगत वळसे-पाटील यांनी नाव न घेता परमबीर सिंह यांच्यावर निशाणा साधला.

सौरभ त्रिपाठी फरार घोषित

अंगडियाकडून खंडणी घेतल्याचा आरोप असलेले आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठीला आजच फरार घोषित करण्यात आल्याची माहिती देताना वळसे-पाटील यांनी दिली.

बागवानप्रकरणी योग्य निर्णय

माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांच्या मालमत्ता हस्तांतराचा मुद्दा हा कौटुंबिक मामला आहे. ते 2009 मध्ये पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. याप्रकरणी सविस्तर माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे वळसे-पाटील म्हणाले.