
दापोलीच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट बेकायदा असल्याचे सांगत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज दापोलीत अक्षरशः दिवसभर नौटंकी केली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांना मुरुड येथे जाण्यास रोखल्याने त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धिंगाणा घालत ठिय्या मांडला. दरम्यान, रात्री उशिरा पोलिसांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्यासोबत असलेल्या नीलेश राणे व भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन जिल्हय़ाबाहेर सोडले.
साई रिसॉर्टवरून बेछूट आरोप करणारे किरीट सोमय्या शनिवारी दापोलीत आले. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काळे झेंडे व जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. व्यावसायिक, स्थानिकांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. दापोलीच्या मुरुड येथील साई रिसॉर्ट परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांचे असून ते बेकायदा असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांचा आहे. मात्र हे रिसॉर्ट आपले नसल्याचे अॅड. अनिल परब यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. असे असताना आज सकाळी किरीट सोमय्या ‘बेकायदा रिसॉर्ट तोडण्यासाठी जात असल्या’चे सांगत भलामोठा ‘नकली’ हातोडा घेऊन मुंबईतून कार्यकर्त्यांसह दापोलीत पोहोचले. मात्र त्यांना मुरुड येथे जाण्यास पोलिसांनी रोखल्याने त्यांनी ड्रामेबाजी सुरू केली. सोमय्या दापोलीत येताच शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सोमय्या यांच्या ड्रामेबाजीचा निषेध केला. दरम्यान, पोलिसांनी दापोली तालुक्यात कलम 144 लागू केले असतानाही सोमय्या यांनी दापोलीत नाहक ड्रामेबाजी करून कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही शिवसेना, राष्ट्रवादीसह स्थानिकांनी केली. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम, शिवसेनेचे सूर्यकांत दळवी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष किशोर देसाई, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, शिवसेना शहरप्रमुख संदीप चव्हाण, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, दापोली नगर पंचायतीचे नगरसेवक, कार्यकर्ते यांनी दापोली उपजिल्हा आरोग्य केंद्राजवळील मंडणगड मार्गाकडे जाणाऱया रस्त्यावर एकत्र येत सोमय्यांना काळे झेंडे दाखवत निषेध केला.
ड्रामेबाजीमुळे हॉटेल व्यावसायिक संतापले
कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून हॉटेल-रिसॉर्ट व्यवसायाचे पंबरडे मोडले आहे. असे असताना सोमय्या यांच्या धिंगाणा सुरू झाल्याने स्थानिक हॉटेल-रिसॉर्ट व्यावसायिक चांगलेच संतापले. सोमय्या यांच्यावर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. सोमय्या यांच्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिक व्यावसायिकांनी दिला.
सोमय्यांना काडीचीही किंमत देत नाही
कुणालाही कुठली लढाई लढायची असेल तर कायदेशीर लढली पाहिजे. कुणीही कायदा हातात घेतला तर त्या संबंधात पोलीस नियमाप्रमाणे जी कारवाई आहे ती करतील असे सांगतानाच किरीट सोमय्या आणि त्यांच्या दौऱयाला काडीचीही पिंमत देत नाही, असा सणसणीत टोला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी हाणला.
हिंमत असेल तर तोडून दाखवाच
सोमय्या रिसॉर्टवरून थयथयाट करीत असले तरी संबंधित रिसॉर्ट आपले नसल्याचे परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत चौकशीही झाली असून हिंमत असेल तर सोमय्यांनी रिसॉर्ट तोडून दाखवावेच, असे आव्हानच परब यांनी सोमय्या यांना दिले. सोमय्या पालिकेचे नोकर आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला.
ही संपलेली गणितं आहेत
कुणाला हातोडा, कुणाला कुदळ, कुणाला फावडा जे घ्यायचे ते घ्या. पण हा शिवरायांचा मर्द मराठा दिल्लीच्या तख्तासमोर नमणार नाही, तो लढत राहणार आणि जिंकतही राहणार, असे रोखठोक प्रत्युत्तर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सोमय्या यांना दिले आहे. नीलेश आणि नीतेश राणे ही आमच्यासाठी संपलेले गणित आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

































































