लय भारी! पुण्यात मेट्रोमध्ये पुस्तक प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात मेट्रो प्रवासात सोमवारी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मेट्रोमधील प्रवाशांनीही या अनोख्या सोहळ्याचे कौतुक करत त्यामध्ये सहभाग घेतला. दिलीपराज प्रकाशनातर्फे संगणकतज्ञ डॉ. दीपक शिकारपूर लिखित ‘आपले डिजिटल जीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो प्रवासात झाले. नियोजित संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाशक राजीव बर्वे, मीना सासणे आदी उपस्थित होते. मेट्रोच्या अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रकाशनाचा आटोपशीर कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी लेखक डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ‘आपले डिजिटल जीवन’ हे वेगळ्या स्वरूपाचे माझे पुस्तक आज मेट्रो सफर करताना प्रकाशित झाले याचा विशेष आनंद आहे. मेट्रो ही आधुनिक जीवनशैली पुणेकरांनी अंगिकारली आहे. त्या अनुषंगाने पुस्तकाचे प्रकाशन मेट्रो प्रवासात करण्यात आले. आगामी काळात आपल्या जीवनात डिजिटल माध्यमामुळे जे बदल घडणार आहेत त्याची माहिती या पुस्तकात दिली आहे. त्याचे आणखी एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक प्रकरणात क्यूआर कोड दिले आहेत. ते स्पॅन केल्यानंतर संबंधित विषयाचे व्हिडिओ तसेच अधिक माहितीही उपलब्ध होणार आहे. जागतिक कविता दिनानिमित्त काव्यशिल्प पुणे या संस्थेतर्फे मेट्रो प्रवासामध्ये कविसंमेलन घेण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी पुस्तक प्रकाशन कार्यक्रम रंगला.