चीनमध्ये हाहाकार… कोरोनाची लाट; माणसेच काय, प्राण्यांनाही गृहकैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेने हाहाकार उडवला आहे. विषाणूची नाकाबंदी करण्यासाठी शांघाय शहरात कडक लॉकडाऊन लावला आहे. या काळात शांघायच्या 2.60 कोटी नागरिकांबरोबर कुत्रे व इतर प्राण्यांनाही गृहकैद केले आहे. त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नसल्याचे चित्र आहे. नव्या लाटेने चीनची चांगलीच दमछाक केली असून इतर देशांनाही चिंतेत टाकले आहे.

ओमायक्रोनच्या नव्या ’स्टेल्थ’ व्हेरिएंटमुळे कोरोना संसर्गाचा कहर झाला आहे. शांघाय हे चीनमधील सर्वात मोठे शहर आहे. 2019 मध्ये वुहान शहरात सर्वप्रथम कोरोनाचा उद्रेक झाला, त्यावेळी इतर शहरांच्या तुलनेत शांघायमध्ये संसर्ग नियंत्रणात होता. मात्र आता ‘स्टेल्थ’ व्हेरिएंटने या शहरात प्रचंड हाहाकार उडवला आहे. यापूर्वी नागरिकांना त्यांच्या इमारतीतील लॉबीमध्ये जाण्यास तसेच कॉलनीत फिरण्यास मुभा दिली जात होती. आता त्यावरही बंदी घातली आहे. नागरिकांना केवळ कोरोना चाचणीसाठी घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. शांघायच्या पुडोन्ग व आसपासच्या परिसरात ‘स्टेल्थ’ व्हेरिएंटने कहर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत कडक लॉकडाऊन लावले आहे. शांघाय शहर आर्थिकदृष्टय़ा संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे या लॉकडाऊनचा चीनसह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे.  लॉकडाऊन लागू असल्याने चीन पुढील काही आठवडय़ांत कोरोनावर मात करेल; परंतु वर्षभर अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल, असे तज्ञांचे मत आहे.

अत्यावश्यक व्यवसाय वगळता सर्व व्यावसायिक आस्थापने बंद राहतील. सार्वजनिक वाहतूकही बंद.

शांघायचे डिस्ने थीम पार्कही बंद. कुत्रा तसेच इतर प्राणीही गृहकैद.

हे आहेत काही कडक निर्बंध…

लॉकडाऊन काळात लोकांनी घरातच राहावे. कॉलनीतही फिरू नये. केवळ कोरोना चाचणीसाठी बाहेर यावे. बाहेरून मागवलेली कोणतीही वस्तू चेकपॉइंटवर सोडली जाईल.

संसर्ग वेगाने पसरत असल्याने कडक पावले उचलली आहेत.