उद्दाम भाषा खपवून घेणार नाही, माजी मंत्री बबनराव लोणीकरांविरुद्ध कारवाई करा; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शासकीय अधिकाऱ्याला धमकी देणे आणि अभद्र भाषा वापरणे आम्ही खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगत उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या अभियंत्याला धमकी देण्यात आली आहे त्यांना गरज पडल्यास पोलीस संरक्षण देण्यात येईल, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी मीटर काढून नेल्यामुळे भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी प्रचंड थयथयाट करत महावितरणचे सहायक अभियंता दादासाहेब काळे यांना अर्वाच्च शिवीगाळ करत घरी पाठवण्याची धमकी दिली. या व्हायरल ऑडिओ क्लिपची गंभीर दखल घेत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोणीकरांविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

बबनराव लोणीकर यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आहे. राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद भूषवलेल्या राजकीय नेत्याला ही भाषा शोभत नाही. स्वत:ला संस्कारी पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपच्या संस्काराचा बुरखाही यानिमित्ताने फाटला आहे असा टोलाही डॉ. राऊत यांनी लगावला. महाविकास आघाडीतील नेत्यांना सातत्याने इन्कम टॅक्स आणि ईडी यांच्या धाडी टाकण्याची धमकी भाजप नेते देत असतात. आता ही धमकी अधिकाऱ्यांनाही देण्यापर्यंतची पातळी या नेत्यांनी गाठली हे अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला हे शोभणारे नाही. त्याबद्दल लोणीकर यांनी महाराष्ट्राची व महावितरणच्या अधिकाऱ्यांची माफी मागायला हवी. दलित वस्त्यांबाबत त्यांनी केलेले वक्तव्यही आक्षेपार्ह आहे. यावरून त्यांची दलित समाजाबद्दलची मानसिकता दिसून येते, अशी टीका ही डॉ. राऊत यांनी केली.

ही आहे वस्तुस्थिती

दोन मीटरचे वर्षभरात 10 लाख बिल भरले असे बबनराव लोणीकर म्हणत असले तरी गेल्या सव्वा वर्षांपासून त्यांनी वीज बिलापोटी छदामही भरलेला नाही.

ग्राहक क्रमांक – ४९००१४८८९१०५, राहूल बबनराव यादव, हाऊस नं. ५२, गट नंबर १४६, आलोक नगर, संभाजीनगर. वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- १८ जानेवारी २०२१. मार्च २२ अखेर एकूण थकबाकी- ३,२१,४७० रूपये. सद्य:स्थितीत वीज जोडणी खंडित केलेली नसून वीज पुरवठा अद्यापही सुरू आहे.

ग्राहक क्रमांक- ४९००११००९२३६, आय.एस. पाटील, प्लॉट नं. ५५, गट नं.१४६, अशोकनगर जवळ, सातारा, संभाजीनगर. वीज बिल भरल्याची अखेरची तारीख- २७ मार्च २०१९. मार्च २२ अखेर एकूण थकबाकी- ६७ हजार २०० रुपये. सद्यस्थितीत वीज बिल थकल्याने वीज पुरवठा तात्पूरता खंडित करण्यात आला आहे.