एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील मेगाभरतीत 100 टक्के  मराठी तरुणांना प्राधान्य द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये (एआयएसएल) होणाऱ्या मेगाभरतीमध्ये 100 टक्के मराठी तरुणांना प्राधान्य द्या, अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, खासदार गजानन कीर्तिकर यांनी यासंदर्भात नवी दिल्ली येथे एआयएसएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच. रामबाबू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

एआयएसएल कंपनीमध्ये 1184 विविध रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. त्यात टर्मिनल मॅनेजर, एअरपोर्ट डय़ुटी मॅनेजर, डय़ुटी ऑफिसर, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह कस्टमर एजंट, रॅम्प सर्व्हिस एजंट, हॅण्डमॅन या पदांचा समावेश आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीमध्ये मराठी तरुणांना प्राधान्य मिळालेच पाहिजे, असा आग्रह खासदार कीर्तिकर यांनी यावेळी धरला. त्यांनी इतरही अनेक मागण्या यावेळी केल्या. त्या मंजूर करण्याचे आश्वासन एच. रामबाबू यांनी यावेळी दिले. याप्रसंगी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस प्रशांत सावंत, सह-सरचिटणीस प्रवीण शिंदे, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.

…या मागण्याही मांडल्या

  • 15 ते 17 वर्षे काम करणाऱया कर्मचाऱयांना अंतर्गत पदोन्नती देण्यात यावी.
  •  कोविडच्या कारणास्तव कर्मचाऱयांच्या पगारात होणारी कपात तत्काळ थांबवा आणि पूर्वी केलेल्या कपातीची सर्व रक्कम परत द्या.
  •   नवी भरती करण्यापूर्वी पूर्वी कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱयांना कामावर प्रथम रुजू करून घ्या.