फडणवीसांविरुद्ध याचिका करणारे वकील सतीश उके यांना ‘ईडी’कडून अटक!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध याचिका करणारे नामांकित वकील ऍड. सतीश उके यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज अटक केली. नागपूरच्या पार्वती नगरातील ऍड. उके यांच्या घरावर पहाटे पाचच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱयांनी धाड घातली. त्यांच्या घराची संपूर्ण झडती घेतली गेली. उके यांची सहा तास कसून चौकशी करण्यात आली. त्यांचा लॅपटॉप, मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्यानंतर ऍड. उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके या दोघांना ईडीने अटक केली. त्यानंतर उके यांच्या घराजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ऍड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्याचे वृत्त नागपुरात वाऱयासारखे पसरल्यानंतर चर्चांना उधाण आले. या कारवाईमागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला गुन्हा लपवला असल्याची तक्रार उके यांनी केली होती. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी उकेंनी केली होती. ऍड. उके हे जेएमएफसी न्यायालयात गेले होते. तेव्हा हा खटला रद्द झाला होता. त्यानंतर उके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने हा खटला चालवण्याची परवानगी दिली. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात फडणवीस उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात ऍड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दुसऱयाही एका प्रकरणात ईडीची ही कारवाई झाली असावी असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. ऍड. उके यांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्याला धमकावून आपली जमीन त्यांच्या नावावर केल्याचा आरोप करीत काही आठवडय़ांपूर्वी एका साठ वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी नागपूरच्या गुन्हे शाखेने उके यांना नोटीसही बजावली होती.

पुरावे नष्ट करण्यासाठीच धाड

आमच्याकडील पुरावे नष्ट करण्यासाठीच ईडीने धाड घातल्याचा आरोप ऍड. सतीश उके यांचे भाऊ प्रदीप उके आणि शेखर उके यांनी केला आहे. ‘ऍड. उके यांनी फडणवीस यांच्याविरोधात अनेक खटले दाखल केले आहेत. एका प्रकरणाचा निकाल चार दिवसांत लागणार होता. पुरावे नष्ट करण्यासाठीच त्यांनी उके यांचा लॅपटॉप, मोबाईल जप्त केला व कागदपत्रांची पाहणी केली. कारण लॅपटॉपमध्ये फडणवीस यांच्याविरुद्धच्या केसेस, भविष्यातील केसेस, तसेच न्यायमूर्ती लोया केस आणि निमगडे केसचे पुरावे होते. फडणवीस यांच्याकडून काही लोकांनी आम्हाला पैशाचे आमिषही दाखवले होते. आमच्याकडे असलेले पुरावे ते नष्ट करतील.’ अशी भीतीही उके बंधूंनी व्यक्त केली. गेल्या एका महिन्यापासून ईडीचे अधिकारी आमच्या घराची रेकी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच धाड

सतीश उके यांच्याकडे न्या. लोया मृत्यू प्रकरण, निमगडे प्रकरण आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणांच्या फाईल्स होत्या. त्या फाईल्स ताब्यात घेण्यासाठीच ’ईडी’कडून उके यांच्या घरावर धाड टाकण्यात आली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ही धाड मुंबईतील ईडीच्या अधिकाऱयांकडून टाकण्यात आली. नागपूरमध्येही ईडीचे कार्यालय आहे, मात्र त्यांना याचा काहीच पत्ता लागू देण्यात आला नाही. ईडीचा गैरवापर करून या फाईल्स जप्त करण्यात आल्या आहेत, असे पटोले म्हणाले. आता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि देशाच्या सरन्यायाधीशांनी यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

n देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दाखल केलेल्या प्रकरणात सतीश उके प्रभावीपणे युक्तिवाद करत आहेत.
n भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही उके यांनी आरोप केले होते.
n न्यायमूर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणीही उके यांनी आवाज उठवला होता.

फडणवीस प्रकरण आणि जस्टिस लोया केसचे महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी ‘ईडी’च्या धाडी, कुटुंबीयांचा आरोप