शाळेत निघालेल्या बहिण-भावाचा अपघाती मृत्यू, नगर-दौंड महामार्गावर अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा पिकअपने समोरून दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. नगर-दौंड महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाजवळील सोनवडी जुन्या टोलनाक्यानजीक आज सकाळी हा अपघात झाला.

अनुष्का गणेश शिंदे (वय 16) आणि आदित्य गणेश शिंदे (वय 14, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बहीण-भावाचे नाव आहे.

अनुष्का आणि आदित्य आज सकाळी निमगाव खलु येथून दुचाकीवरून दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निघाले होते. नगर-दौंड महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाजवळील सोनवडी येथील जुन्या टोल नाक्याजवळ एका टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव पिकअपने बहीण-भावाच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात बहीण भावाचा मृत्यू झाला.

अनुष्का आणि आदित्यचे वडील पेंटर काम करीत असल्याची माहिती समजली आहे. सख्ख्या बहीण-भावाचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने निमगावसह परिसरावर शोककळा पसरली आहे.