
गुणवत्तेचे परीक्षक सर्वच केंद्रांवर पाठवणे गरजेचे आहे. त्यानुसार आता प्रत्येक परीक्षक हे दहा नाटकांमध्ये काम केलेले असावेत, अशी प्रमुख अट ठेवली आहे. त्याशिवाय त्यांचा नाटय़प्रवास, त्याचे व्यक्तिमत्त्व आणि इतर सर्व गोष्टींचा विचार करूनच परीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक व कार्य मंत्रालय संचालक बिभीषण चकरे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने हौशी कलावंतांना एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळावे म्हणून राज्य नाटय़ स्पर्धेचे आयोजन केले जाते. या राज्य नाटय़ स्पर्धेसाठी परीक्षकांची निवड करताना शासनाला कसरत करावी लागत होती; मात्र आता सांस्कृतिक विभागाचे संचालक बिभीषण चकरे यांनी राज्य नाटय़ स्पर्धेचे परीक्षक निवडताना निकषांच्या पातळीत नव्याने बदल करून परीक्षक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
नव्या निकषानुसार शासनाच्या वतीने हौशी कलावंतांच्या नाटय़कृतीचे परीक्षण करण्यासाठी जाणाऱया परीक्षकांनी किमान 10 नाटकांमध्ये काम केलेले असावे, अशी मुख्य अट आहे. शिवाय त्याचे नाटय़ क्षेत्रातील योगदान, त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि त्यांनी सादर केलेल्या कलाकृतींचे अवलोकन अशा सर्व गोष्टींचा समावेश यात करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात उत्कृष्ट अशा परीक्षकांची कलावंतांना साथ लाभणार असून, कलाकृतीवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, याची शाश्वती चकरे यांनी दिली आहे.
2018 मध्ये पलांडे यांनी संचालकपदी असताना सर्व बाल कलावंतांना आणि मोठय़ा कलावंतांना राज्य नाटय़ स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबाबत प्रमाणपत्र देण्याचे निश्चित केले होते. मात्र, 2022 उजाडले तरी बालकलावंत आणि मोठय़ा कलावंतांनाही प्रमाणपत्र देण्याचा प्रस्ताव अजूनही जसाच्या तसा कागदावर ठेवण्यात आला आहे. यामुळे छोटय़ा कलावंतांना शालेय गुणासाठी आणि इतर ठिकाणी लागणाऱया प्रमाणपत्राचा उपयोग होताना दिसत नाही, असे लक्षात येत आहे.
परीक्षकांची बऱयाचदा सरसकट, कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता निवड केली जात असे. परीक्षकासाठी योग्य वाटतात, अशा लोकांना परीक्षक म्हणून नेमणूक मिळत असे. राज्यातील कलावंतांनी केलेल्या वारंवारच्या तक्रारी लक्षात घेऊन आता संचालकांनी स्वतः यात लक्ष घालून परीक्षकांच्या वैयक्तिक नाटय़ प्रवासाचा अभ्यास करून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा धांडोळा घेऊन मगच त्यांची परीक्षक म्हणून मान्यता देण्यात येणार आहे.
आजपर्यंत होणाऱया नाटय़ परीक्षणामध्ये बऱयाचदा गैरप्रकार होत असे. पण आता शासनाने अशा पद्धतीने 10 नाटकांत काम केलं, तरच परीक्षक होता येईल अशी अट घातली असेल, तर याचा गुणवत्तेचे परीक्षण होण्यासाठी चांगला फायदा होऊ शकेल.
– राजू रंगम, नाटय़ दिग्दर्शक.


























































