
नागरी सहकारी बँकेतील अग्रणी असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये आता बेस्टच्या वीज बिल ग्राहकांना रोखीने बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टीजेएसबीशी संलग्न 61 बिल कलेक्शन काऊंटरवरून ही सुविधा बेस्ट वीज ग्राहकांना मिळणार आहे. तसेच बेस्टच्या bestundertaking.net या वेबसाईटवरून वीज बिल भरण्यासाठी टीजेएसबी बँकेने पेमेंट गेटवे या माध्यमातून ऑनलाइन सुविधादेखील उपलब्ध केली आहे.
टीजेएसबी सहकारी बँक आणि बेस्ट यांच्यात गुरुवारी याबाबत सामंजस्य करार झाला. बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी याबाबतची घोषणा केली. बेस्टने टीजेएसबी बँकेला या संदर्भाचे अधिकृत पत्र दिले आहे. मुंबईत आज झालेल्या एका कार्यक्रमात याचे निवेदन करण्यात आले. या कार्यक्रमाला टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल, बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र उपस्थित होते. दरम्यान, बेस्ट ग्राहकांनी खातेदार म्हणून टीजेएसबी बँकेत सहभागी व्हावे, असे आवाहन विवेकानंद पत्की यांनी केले.


























































