
ज्ञान, कला, क्रीडा, सेवा आणि आरोग्य या क्षेत्रांत गेली 50 वर्षे अविरत काम करणाऱया ‘प्रबोधन, गोरेगाव’ या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता 1 एप्रिल रोजी होत आहे. यानिमित्त गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे सायंकाळी 6 वाजता सुवर्णमहोत्सव सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रबेधन गोरेगावचे संस्थापक आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई या मान्यवरांची या वेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचा लाइव्ह कॉन्सर्ट हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहे. सुवर्णमहोत्सवी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘प्रबोधनची पन्नाशी’ या प्रबोधनच्या गेल्या 50 वर्षांतील वाटचालीच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच प्रबोधनच्या चित्रफितीचे अनावरणदेखील या वेळी होणार आहे.






























































