मनतरंग – परीक्षा… घ्या रे बाबा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरुरकर-सौदागर

परीक्षा तोंडावर आली असता अभ्यासाच्या नियोजनाबरोबरच त्याची भीती न वाटावी यासाठी प्रॅक्टिस जी चालते ती मुलांना समाधान देऊन जाते. हे सर्व करताना जे स्वतःलाच स्वतःचं कौतुक वाटतं, त्यालाच (Self Appreciation) असं म्हणतात, जे पुढील आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे स्वतःवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाऊन तो कुठच्याही कठीण प्रसंगांना तोंड द्यायला शिकवतो. विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवतो.

परीक्षा…हा शब्द ऐकल्यावर आपल्यापैकी कोणालाच आनंद असा होत नाही. उलट या शब्दाची आपण सर्वांनी इतकी धास्ती घेतली आहे की, आपल्यापैकी कित्येक जणांना मोठं झाल्यावरसुद्धा ‘आपण परीक्षेला बसलोय’ अशी स्वप्नं पडत असतात. लहानपणापासून आपण जवळ जवळ सगळेच परीक्षेला नाकं मुरडतच मोठे झालोय आणि मोठं झाल्यावरही या परीक्षेने काही आपली पाठ सोडलेली नाही. घरी आपली किंवा घरातील इतर लहान मुलं शाळा – कॉलेजात असतील तर त्यांच्या परीक्षेचं वेळापत्रक आपण नकळत पाळत असतो. त्यात जर दहावी-बारावीचं वर्ष असेल तर मग बघायलाच नको. ‘अभ्यास एके अभ्यास’ या मूलमंत्रावरच अख्खं घर चालतं.

चिरायूच्या (नाव बदलले आहे) घरी काही वेगळी परिस्थिती नव्हती. शाळेव्यतिरिक्त कोचिंग क्लास आणि त्याच्याही परीक्षा यामुळे त्याचे वर्ष आता बिझी जात होते. चिरायू तसा बघायला गेलं तर हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला गेलेला विद्यार्थी होता. अभ्यासातील प्रगतीबरोबरच तो शाळेतल्या इतर उपक्रमांमध्येही तितक्याच हिरीरीने सहभागी होत असे. नववीपर्यंत त्याचा आलेख हा असा चढता होता. दहावीचे पहिले सहा महिनेही तसे चिरायूसाठी व्यवस्थित होते.

एक दिवस अचानक रात्री मला त्याचा फोन आला, ‘‘मॅम, मी आज घर सोडून जातोय.’’ हा असा कॉल आणि चिरायूसारख्या गुणी मुलाचा! नक्कीच त्याचं बिनसलेलं होतं. शाळेमध्ये समुपदेशन करताना काही वेळा वर्गांना भेटी द्याव्या लागत. त्या भेटींमध्ये काही विद्यार्थी हे लक्षात राहत. चिरायू हा त्यापैकी एक असा गुणी विद्यार्थी होता. कायम उत्साही आणि शिस्तीचे पालन करणारा. शाळेचा एक चांगला डान्सर म्हणून तो ओळखला जात होता. असं मुलगा आज घरात भांडून आई-बाबांना सोडायच्या गोष्टी करत होता.

‘‘माझ्या मम्मी – पप्पांनी मला शाळेच्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग नाही घ्यायचा असं सांगितलंय. काय आहे हे? आता शेवटचं वर्ष आहे माझं. नंतर मिळणार आहे का शाळेत स्पर्धांमध्ये भाग घ्यायला?’’ चिरायूचा राग त्याच्या बोलण्यातून मध्येच फाटणाऱया आवाजातून कळत होता. ‘‘सारखं काय दहावी – दहावी लावलंय? मी अभ्यास करतोय नं! अजून किती करू? मी यावर्षी कुठेच फिरलो नाही. मित्रांबरोबर जास्त खेळतही नाही, पण मॅम, मी डान्सशिवाय नाही राहू शकत.’’ कसंबसं त्याला शांत करून घरी जायला सांगितलं. दुसऱया दिवशी त्याच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावण्यात आलं.

‘‘तो बोलतोय ते खरं आहे. आम्हीच त्याला स्पर्धेत भाग घेऊ नकोस असं सांगितलंय. दहावीचं वर्ष आहे. मग कशी परवानगी द्यायची?’’

‘‘पण मी अभ्यास करतोय. सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत माझं शाळा-क्लासेस संपतात. फक्त रविवारी माझ्या ग्रुपबरोबर प्रॅक्टिस करतो.’’ चिरायू रडत सांगत होता.

‘‘अरे, तू रोज प्रॅक्टिस करतो आहेस’’ त्याची आई पटकन म्हणाली.

‘‘कारण, पुढच्या आठवडय़ात डान्स कॉम्पिटिशन आहे’’ चिरायू जवळ जवळ तिच्या अंगावर ओरडला. चिरायूचे पालक त्यांच्या दृष्टीने बरोबर म्हणत होते. कारण दहावीच्या मार्कांनी त्याचं भवितव्य ठरणार होतं आणि म्हणूनच त्यांनी त्याला अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही उपक्रमांत सहभागी होण्याची परवानगी दिली नव्हती.
शाळेची दहावी असू दे किंवा कुठलंही वर्ष असू दे, त्यात पार पडणाऱया परीक्षा या मार्कांबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या असतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर परीक्षेसारखे उत्तम परिमाण नाही, पण दुर्दैवाने परीक्षेचा संबंध फक्त मार्कांपुरता लावला जातो.

परीक्षा ही मुलांना ‘वेळेचे आणि ताणाचे नियोजन’ करण्यास शिकवते, जे मुलांना पुढील आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा पेपर मोठा (मुख्यतः भाषा) असतो तेव्हा कुठल्या प्रश्नाला कसा आणि किती वेळ दिला पाहिजे (वेळेचे नियोजन), काही उत्तरं जर पेपर सोडवताना आठवली नाहीत तर मन शांत ठेवून पुढचे कुठले प्रश्न सोडवायचे (निर्णय क्षमता) हे आपल्याला शिकवून जाते.

परीक्षा तोंडावर आली असता अभ्यासाच्या नियोजनाबरोबरच त्याची भीती न वाटावी यासाठी प्रॅक्टिस जी चालते ती मुलांना समाधान देऊन जाते. हे सर्व करताना जे स्वतःलाच स्वतःचं कौतुक वाटतं, त्यालाच (Self Appreciation) असं म्हणतात, जे पुढील आयुष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यामुळे स्वतःवरचा विश्वास अधिकाधिक दृढ होत जाऊन तो कुठच्याही कठीण प्रसंगांना तोंड द्यायला शिकवतो. विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवतो.

याबरोबरच परीक्षा आणि अभ्यासाच्या निमित्ताने इतरांशी केलेली बातचीत (संवाद कौशल्य), अभ्यासात मदत करणे किंवा घेणे या सर्वांमुळे व्यक्तिमत्त्व विकास हा आपसूकच घडत जातो. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. फक्त प्रसंग किंवा परिस्थितीचा बागुलबोवा न करता त्यातून शिकण्याची व सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्याची गरज आहे. प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर येणारा रिझल्ट हा चांगलाच असतो.

या आणि अशा बऱयाच गोष्टी चिरायू आणि त्याच्या पालकांना सांगण्यात आल्या. तसंच त्यांना ‘दहावी ही फक्त पुढे जायची पायरी आहे. तो शेवट नाही. अभ्यासाबरोबर इतर छंद हे ताण / कंटाळा घालवण्यासाठी महत्त्वाचे आहेत’ हे पटवून देण्यात आले. त्याच्याच जोडीला चिरायूला काही अभ्यास करण्याच्या टिप्स देण्यात आल्या. जशा की; प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक बनवणे, प्रत्येक विषयाला किमान 45 मिनिटे वेळ देणे, वाचन आणि लिखाणासाठी आवश्यक तो वेळ देणे, शाळा-क्लासेसच्या व्यस्त वेळेतून मोकळा वेळ स्वतःसाठी काढणे, छंद जोपासणे,कुठलाही व्यायाम प्रकार नियमितपणे करणे. चिरायूने या सूचना व्यवस्थित लक्षात घेतल्या आणि त्यांचे जमेल तेवढे पालन केले. त्याने त्यावर्षी शाळेत डान्स कॉम्पिटिशनमध्ये पारितोषिक मिळवले. त्यानंतर तो पुन्हा जोमाने अभ्यासाला लागला. दहावी उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाला. पुढे चिरायूने नामांकित कॉलेजात प्रवेश मिळवून बारावीही उत्तम मार्कांनी पार केली. जोडीला त्याच्या डान्स कॉम्पिटिशन्सही होत्याच.

इथे आवर्जून लिहावंसं वाटतंय…. आज चिरायू हा उत्तम नृत्यदिग्दर्शक झाला आहे. त्याचा मोठा ग्रुपही तयार झालाय. या त्याच्या क्षेत्रात तो उत्तम कामगिरी करत आहे.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
[email protected]