खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदा पार्किंग, कोणीही यावे पार्किंग करून जावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेर नो-पार्किंगची ऐशी की तैशी झाली आहे. ‘कोणीही यावे आणि पार्किंग करून जावे’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खांदेश्वरकरांच्या या बेफिकिरीमुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले असून वाहतूक पोलिसांनीदेखील हात टेकले आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

टोइंग व्हॅनच्या माध्यामातून शहरात वाहनधारकांना आवाहन केले जात आहे. नो-पार्किंग क्षेत्रात वाहने उभी करू नका, वाहने उभी दिसल्यास त्यांना टोइंग करण्यात येईल, असे सांगितले जाते. तरीही काही बेफिकीर वाहनचालक स्थानकाबाहेर आपली वाहने पार्क करून बिनधास्त फिरतात. यामुळे स्थानकात ये-जा करणार्‍या ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले यांच्यासह प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान ‘हम नही सुधरेंगे’ अशी भूमिका खांदेश्वरकरांनी घेतली असली तर संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे.