
अट्टल गुन्हेगार सनीदेवल सुरेश काळे याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून, सात गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून सुमारे साडेअठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मेद्रप, कामती, पूर्णा अक्कलकोट, पालम पोलीस ठाण्यांत दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास शांताबाई दत्तात्रय कोळेकर यांच्या घरी दरोडा पडला होता. यात सहा दरोडेखोरांनी जबर मारहाण करून तीन लाख 16 हजार रुपयांची रोकड दागिने, तसेच शेजारी राहणाऱेया सविता माने यांना मारहाण करून दोन लाख 80 हजार 500 रुपये किमतीचे दागिने व रोकड लुटून नेली होती. याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घटनेच्या तपासादरम्यान संशयित आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार सनीदेवल सुरेश काळे (रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलीस पथकाने माग काढून परभणी जिह्यातील पूर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताब्यात घेतले.
तपासात सनीदेवल व त्याच्या नातेवाईकांनी शिरवळ हन्नूर, चपळगाव, पानमंगरूळ, तडवळ (ता. अक्कलकोट), सौंदणे (मोहोळ) येथे दरोडे व घरफोडी केल्याची सात गुह्यांची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 39 तोळे सोन्याची दागिने आठ तोळे चांदी असा 18 लाख 76 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.






























































