
- नवनाथ शिंदे
पुणे शहरातील जुना कात्रज घाट रस्त्यासह नवीन कात्रज बोगदा परिसरातील कायदा सुव्यवस्था वाढविण्यासाठी पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार स्थानिक व्यापारी, मंदीर ट्रस्ट, हॉटेल व्यावसायिक, पेट्रोलपंप मालकांच्या लोकसहभागातून परिसरात सीसीटीव्हींचे जाळे विणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे चोरट्यांकडून अंधाराचा फायदा घेउन लुटमार, दरोडा, खूनाचा प्रयत्न, खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी घाटात मृतदेह टाकण्याच्या घटनांना आळा बसणार आहे. त्याशिवाय अपघातग्रस्तांची माहिती मिळून त्यांना वेळेत रूग्णालयात दाखल करता येणार आहे.
अंधाराचा गैरफायदा घेऊन कात्रज घाट परिसरात लुटमारीसह विविध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिसांकडून मोहिम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः परिसरातील अपघात आणि खून करून मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्याच्या घटनांमुळे त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी नवीन कात्रज बोगदा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. त्याशिवाय स्थानिक दुकानदार, लोकसहभागातून सीसीटीव्ही वॅâमेरे बसविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. कात्रज घाट परिसराच्या सुरक्षिततेसाठी मंदीर ट्रस्ट, पेट्रोलपंप मालक, दुकानदारांनी तात्काळ सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे आता परिसरातील बारीक-सारिक घटनांवर पोलिसांकडून लक्ष्य वेंâद्रित केले जात आहे.
गतवर्षी कात्रज बाह्यवळण मार्गासह जुन्या घाट रस्त्यावर गंभीर अपघातांची संख्या 16 वर आहे. सीसीटीव्हींमुळे अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळणार आहे. त्याशिवाय अपघातग्रस्त वाहनचालकांच्या चुका कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यामुळे आरोपी निष्पन्न होणार आहेत. त्याशिवाय बाह्यवळण मार्गावर खूनानंतर मृतदेह टाकून देण्याचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापार्श्वभूमीवर सीसीटीव्हींचे जाळे संबंधित परिसरातील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. अंधाऱ्या जागेत पथदिवे बसविण्यासंदर्भातही प्रस्ताव पोलिसांकडून पाठविण्यात आला आहे. दोन्ही रस्त्यांवर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटककडे जाणारी वाहने जुना कात्रज घाट आणि बाह्यवळण मार्गाचा अवलंब करतात. त्याशिवाय पुणे-मुंबईकडे ये-जा करणारी मालवाहू वाहने, प्रवासी वाहनेही परिसरातून मार्गक्रमण करतात. त्यामुळे सीसीटीव्हींची नजर पोलिसांसह स्थानिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मृतदेह टाकण्याची जागाही सीसीटीव्हीच्या कक्षेत
वाढत्या गुन्हेगारीसह किरकोळ वादातून खूनाच्या घटनानंतर मृतदेह मोकळ्या जागेत टाकण्याचे प्रकारही कात्रज घाट परिसरात वाढीस लागले होते. मात्र, आता दोन्ही बाजूला सीसीटीव्हींची नजर गुन्हेगारांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी सक्षम करण्यात आली आहे. त्याशिवाय जुना कात्रज घाट रस्ता आणि मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनांना धडक देऊन पसार होणारे बेशिस्त वाहनचालकही सीसीटीव्हींच्या कक्षेत आले आहेत.
कात्रज घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता वाढण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय गंभीर गुन्ह्यांची उकल होण्यासाठीही सीसीटीव्हींचे रेकॉडिंग महत्वाचे ठरणार आहे. प्रशासन, शासन आणि स्थानिक लोकसहभागातून सीसीटीव्ही, पथदिवे बसविण्यासाठी प्राधान्य दिले आहे. दुसरीकडे बेशिस्तपणे वाहन चालवून अपघातानंतर पसार झालेल्या चालकांचाही शोध घेता येणार आहे.
– सागर पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
कात्रज घाट परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने घाटाच्या अलीकडे असलेल्या चार ते पाच स्थानिक व्यावसायिकांनी कॅमेरे बसविले आहेत. त्याशिवाय पेट्रोलपंप मालकांनीही सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे लुटमार, अपघात, खूनासारख्या गंभीर घटनांना आळा बसणार आहे.
जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे
मृतदेह टाकण्याच्या घटना
वर्ष जुना घाट बाह्यवळण मार्ग
2020 1 2
2021 1 5
कात्रज जुना घाट परिसर अपघात
वर्ष जुना घाट बाह्यवळण मार्ग
2020 3 8
2021 4 12































































