उन्हाची तीव्रता, वाढत्या उपशाने धरणांतील पाणी घटले, विभागातील साठा 64 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन-तीन वर्षांपासून वरुणराजाच्या कृपेने मराठवाडा विभाग पाणीदार राहिला आहे, त्यामुळे या विभागाची टँकरमुक्तीकडे दमदार वाटचाल होऊ शकली आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे, त्यामुळे धरणांतील पाण्याचे वाढते बाष्पीभवन आणि वाढत्या उपशामुळे मराटवाड्याच्या धरणांतील पाणीसाठा 64.36 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. असे असले तरी मुबलक पाणी असल्याने उन्हाळ्यात टंचाईची झळ तेवढ्या तीव्रतेने जाणवण्याची शक्यता नाही.

संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाडा विभागावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून वरुणराजाची कृपा होत आहे. मोसमी पावसाबरोबरच अवकाळी पावसाने या विभागातील प्रकल्प भरण्यास आणि भू-गर्भातील पाणीपातळी वाढण्यास फार मोठी मदत झाली आहे. काही प्रकल्प तर अनेक वेळा ओव्हरफ्लो झाले आहेत. त्याचा चांगला फायदा येथे झाला आहे. गेली अनेक वर्ष टँकरच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्यांना निसर्गाने दिलासा दिलेला आहे. त्याचा परिणाम अद्याप टँकर्सने पाणीपुरवठा करावा, अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही.

64 टक्के पाणीसाठा उपलब्ध

मराठवाडा विभागात वेळी-अवेळी पडलेल्या पावसामुळे विभागातील बहुतांश प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. त्यामुळे भू-गर्भातही पाणीसाठा अधिकचा होण्यास मदत झाली. सध्या मार्च महिना संपून एप्रिल महिना सुरू झाला आहे. उन्हाची तीव्रता अधिक जाणणारे दिवस अधिक पुढेच आहेत. मात्र सध्याच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे.

वाढत्या उष्णतेमुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. शिवाय शेती, व्यवसाय आणि पिण्यासाठी धरणांतील पाण्याचा उपसा वाढल्यानेही या प्रकल्पातील पाणीसाठा कमी कमी होत आहे. सध्या विभागातील धरणांत सध्या 64.36 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रकल्पांत 70.42 टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पात 65.82, लघु प्रकल्पांत 45.56 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

बंधारेही डबडबलेले

मराठवाड्यातील टंचाई दूर व्हावी, यासाठी गोदावरी, मांजरा, तेरणासह रेणा या मोठ्या नद्यांवर बंधारे उभारून पाणी साठविण्यात येत आहे. एकट्या गोदावरी नदीवर 15 बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्याचा संकल्पीत साठा 347.227 दलघमी आहे. सध्या या बंधाऱ्यात 195.907 दलघमी म्हणजे 56.42 टक्के पाणी उपलब्ध आहे. अन्य मोठ्या नद्यांवर 25 बंधारे आहेत. या बंधाऱ्यात सध्या सर्वाधिक 88.33 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.