
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर दिलीप वळसे-पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित असून पोलिसांचे सर्वत्र लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. त्यासाठी आंदोलन करत राज्यात अस्वस्थता आणि अस्थिरता पसरवण्याचा त्यांचा डाव असल्याचे वळसे पाटील म्हणाले. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे. मात्र महाराष्ट्रात असे काही होईल असे वाटत नाही. पोलीस सर्वत्र लक्ष ठेवत आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले. भाजपच्या या अजेंडयाची सुरूवात कर्नाटक राज्यातून झाली आहे आणि इतर राज्यांमध्येही हा अजेंडा भाजपने सुरू केला आहे, असेही ते म्हणाले.
राज्यात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. राज्यातील पोलीस यंत्रणा आपापल्यापरीने लक्ष ठेवून आहेत. भविष्यात कायदा व सुव्यवस्था अशीच ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले.
महाविकास आघाडी सरकार मजबूत
केंद्रीय तपास यंत्रणा आणि ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. महाविकास आघाडी मजबूत असून सरकारला कोणाताही धोका नाही. आमचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमचे सरकार जनतेला अनेक सुविधा देत असून राज्याचा विकास करण्याचा आमचा हेतू आहे, असेही ते म्हणाले.
राजकीय हेतूने कारवाई
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता त्यांच्यावर ईडी कारवाई करत असेल तर केंद्र सरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे, हे लक्षात येत आहे. राजकीय हेतूने अशा कारवाया होत असल्याचे दिसत आहे, असेही ते म्हणाले. मात्र, अशा कारवायांमुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.































































