
मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे अष्टपैलू कलाकार म्हणजे निळू फुले. अनेक चित्रपटांत त्यांनी खलनायकाच्या भूमिका रंगवल्या असल्या तरी वास्तविक जीवनात त्यांचे समाजकार्य खूप मोठे आहे. आता निळू फुले यांचा जीवनप्रवास बायोपिकमधून उलगडणार आहे. अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
सोमवारी निळू फुले यांच्या जन्मदिनानिमित्त पोस्ट करत प्रसाद म्हणाला, निळूभाऊ…आज तुमचा वाढदिवस…!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्षे माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं, अनुभवता आलं. तुमच्याकडून बरंच काही शिकलो. तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन गुरुच मानलं. तुमचा आशीर्वाद म्हणूनच की काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली गुरुदक्षिणा असेल…!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ…!!! प्रसादची ही पोस्ट व्हायरल होत आहे.
























































