चीन बेजार; कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक, शांघायमध्ये लॉकडाऊन निष्फळ; रुग्णालये फुल्ल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चीन बेजार झाला आहे. 27हून अधिक शहरांमध्ये संसर्गाचा भयंकर उद्रेक झाला आहे. शांघायमध्ये बुधवारी 2019नंतरची सर्वात मोठी रुग्णवाढ नोंद झाली. शहरातील सर्व रुग्णालये फुल्ल झाली असून कडक लॉकडाऊनही निष्फळ ठरले आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराचे जवान तैनात केले आहेत.

देशात बुधवारी 20 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून एका दिवसात नोंद झालेली ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. शांघायच्या रुग्णालयांतील सर्व खाटा फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे नवीन रुग्णांसाठी रुग्णालयांत जागा उरलेली नाही. रुग्ण संख्येचा उद्रेक झाला असताना सुदैवाने अजून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा चीनच्या प्रशासनाने केला आहे. शांघायमध्ये 10 हजारांहून अधिक आरोग्य कर्मचारी कोरोना लढय़ात सक्रीय झाले आहेत. तसेच शहरभर लष्कराचे जवान तैनात आहेत.

हिंदुस्थानात 24 तासांत 36 टक्के रुग्णवाढ

हिंदुस्थानात मागील 24 तासांत 1,086 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याची नोंद बुधवारी करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत ही रुग्ण संख्या 36.6 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच 71 कोरोनाबळींची नोंद झाली. पेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली. राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत 185.04 कोटी डोस देण्यात आले आहेत.

2 कोटी 60 लाख जनता घरात कैद, मार्केट बंद, जीवनावश्यक वस्तू मिळेनात

संसर्ग रोखण्यासाठी सरकारने शांघायच्या 2 कोटी 60 लाख जनतेला घरात कैद केले आहे. शहरातील सर्व सुपर मार्केट बंद असून जीवनावश्यक वस्तू मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे जनतेची उपासमार सुरू आहे.

शांघायमध्ये 4 एप्रिलला 13086 कोरोना रुग्ण आढळले. त्यानंतर 5 एप्रिलला 16,766 रुग्णांची भर पडली. त्यापाठोपाठ बुधवारी देशात 20,472 रुग्ण वाढले.