
राज्यात दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उरला असून विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गुजरात आणि इतर राज्यांतून खुल्या बाजारातून जादा दराने वीज घेण्यापूर्वी आवश्यक असलेल्या वीज खरेदी कराराला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात उद्या शुक्रवारी राज्यमंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोडशेडिंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक शहरासह ग्रामीण भागात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा चढत असतानाच लोडशेडिंग सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डोंबिवलीत आठ तास लोडशेडिंग करावे लागले होते. राज्यात सध्या दररोज 28 हजार मेगावॅट विजेची मागणी आहे. नजीकच्या भविष्यात ही मागणी 32 हजार मेगावॅट वीज बाहेरून घ्यावी लागेल. त्यामुळे राज्यात लोडशेडिंग अनिवार्य होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जादा दराने बाहेरून वीज खरेदी करावी लागेल. या वीज खरेदीसाठी वीज खरेदी करार आवश्यक आहे. या कराराला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे.




























































