पश्चिमरंग – कथा पाश्चात्य स्वरलिपीची

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुष्यंतकुमार पाटील 

पाश्चात्त्य संगीत विश्व, त्यातील नाद, त्याच्या संकल्पना, संज्ञा यांची नेमकी जाण करून देणारे सदर इजिप्तमध्ये प्राचीन काळी बांधल्या गेलेल्या पिरॅमिडस्मधल्या चित्रांमध्ये बऱ्याच प्रकारची संगीत वाद्ये आढळतात. ही चित्रं पाहताना त्या काळातल्या दैनंदिन जीवनात संगीताचं स्थान महत्त्वाचं होतं हे स्पष्टच दिसतं. खरं तर प्राचीन काळातल्या जगभरातल्या अनेक संस्कृतींमध्ये संगीत प्रचलित होतं याचे पुरावे मिळतात, पण दुर्दैवाचा भाग म्हणजे हे संगीत नेमकं कसं होतं हे आपल्याला आज कळू शकत नाही.

आज वापरात असणाऱ्या स्वरलिपीशी साधर्म्य असणाऱया लिपीची सुरुवात मध्ययुगात (सर्वसाधारण अकराव्या शतकात) युरोपमध्ये झाली. हा काळ आजच्या काळापेक्षा बराच वेगळा होता. या काळात लोकांच्या मनावर धर्माचा प्रचंड पगडा होता, या काळातील ख्रिश्चन धर्मातील साधक ईश्वराची आराधना करताना धार्मिक संगीताचं समूहानं गायन करायचे. युरोपमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे गायन एकाच चालीत होणं अपेक्षित होतं. पिढय़ान्पिढय़ा हे संगीत चाल न बदलता तसंच राहणंही गरजेचं होतं.

प्रत्यक्षात संगीतातल्या चाली सर्वत्र एकसारख्या ठेवण्यात काही अडचणी होत्या. पूर्ण संगीताच्या चाली लक्षात ठेवण्यासाठी साधकांना अक्षरशः 15-20 वर्षे लागायची. दुसरं म्हणजे मौखिक परंपरेनं हे संगीत पुढं चालत आल्यानं यातल्या चालींमध्ये नकळत बदल होत जायचे. संगीत गाताना त्यातल्या चालींमध्ये बदल होणं अपरिहार्य होतं. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे जवळपास एक हजार वर्षांपूर्वी एका साधकाला हा सारा प्रकार लक्षात आला. त्याने ही समस्या सोडवण्यासाठी कल्पकता दाखवली. त्यानंतर संगीताचा इतिहासच बदलून गेला. या साधकाचं नाव होतं गिडो. इ. स. 991 च्या आसपास इटलीमध्ये जन्मलेल्या गिडोविषयी आज फारशी माहिती उपलब्ध नाही. पॉम्पोसा इथं साधना करताना संगीतातल्या चाली लक्षात राहाव्यात म्हणून त्यानं संगीत लिहिण्याची पद्धत बनवण्याचा प्रयत्न केला, पण गंमत म्हणजे तिथल्या इतर साधकांना हा प्रकार मुळातच आवडला नाही. त्यांनी गिडोच्या या प्रयत्नांना कडाडून विरोध केला. शेवटी 1025 मध्ये गिडोला तिथून काढून टाकण्यात आलं. मग तो हे ठिकाण सोडून अरिझो नावाच्या ठिकाणी गेला.

अरिझोमधल्या बिशपनं त्याला चर्चशी संबंधित विद्यालयात शिक्षक म्हणून घेतलं आणि त्याला संगीतावरचं एक पुस्तक लिहिण्याचं काम दिलं. संगीत लिहिण्याच्या पद्धतीवरही त्यानं या काळात बरंचसं काम केलं. जे संगीत स्मरणशक्तीचा वापर करत लक्षात ठेवून गाण्यासाठी 10 वर्षं लागतं, तेच संगीत त्याच्या पद्धतीनं लिहिलेल्या संगीताचा वापर करत गाण्यासाठी 6 महिने ते एक वर्ष पुरेसे होते असा त्याचा दावा होता. खरं तर संगीत लिहिण्याची एक पद्धत आधीपासूनच अस्तित्वात होती, पण त्यात खूपच त्रुटय़ा होत्या. गिडोनं या पद्धतीत बऱयाच सुधारणा केल्या. संगीत लिहिण्याच्या या पद्धतीत रेषा आणि रेषांमधल्या जागा यामध्ये काढलेली चिन्हे नेमके स्वर दाखवू लागल्या. ही एकप्रकारे पाश्चात्त्य स्वरलिपीची (स्टाफ नोटेशन्सची) सुरुवात होती. पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासातला हा निर्विवादपणे एक महत्त्वाचा टप्पा होता.

गिडोनं बनवलेली संगीत लिहिण्याची पद्धत क्रांतिकारक होती. कागदावर लिहिलेलं संगीत वाचून मुलांनी समूहगायन करण्याचा प्रकार मानवी इतिहासात पहिल्यांदा घडला. नंतर बाराव्या शतकात संगीत लिहिण्याची ही पद्धत जवळपास साऱया युरोपमध्ये वापरली जाऊ लागली. चर्चमधलं संगीत पहिल्यांदाच लिहिलं जाऊ लागलं. अखंड युरोपमध्ये साऱया ठिकाणी ते संगीत एकसारखं गायलं जाऊ लागण्याची किमया घडली.

संगीत लिहिण्याच्या या पद्धतीचा अजून एक परिणाम झाला. संगीत लिहिण्याची पद्धत नसताना सारं संगीत हे गायक/वादक यांच्या कौशल्यावर आधारित असायचं. गायक/वादक लोक आपलं संगीत सादर करताना उत्स्फूर्तपणे स्वतःच्या प्रतिभेने त्यात सर्जनशीलतेने बदल करत जायचे. हे संगीत जतन करता येणं शक्य नव्हतं. तसंच एकानं सादर केलेलं संगीत दुसऱयानं जसंच्या तसं सादर करणं म्हणजे अवघड गोष्ट होती, पण आता संगीत लिहिणं शक्य असल्यानं संगीत रचना लिहिणं शक्य होऊ लागलं. संगीताची रचना करणारे लोक पहिल्यांदाच दिसू लागले. एकानं रचलेलं संगीत दुसऱयानं सादर करणं हे आता शक्य होऊ लागलं. एका अर्थानं ही मोठी क्रांती होती आणि यामुळं भविष्यात संगीत एका वेगळ्याच दिशेनं जाणार होतं.
 [email protected]