‘विक्रांत’च्या निधीचे गौडबंगाल; सोमय्या पितापुत्रांची जामिनासाठी धावाधाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘विक्रांत’ युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली कोटय़वधी जनतेकडून गोळा करून हडप केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि निल सोमय्या हे पिता-पुत्र चौकशीस गैरहजर राहिले. विक्रांत वाचवा निधी घोटाळाप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी या दोघांनाही समन्स बजावून शनिवारी सकाळी 11 वाजता चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते.

विक्रांत’च्या नावाखाली निधी गोळा करून अपहार केल्याचे उघडकीस येताच माजी सैनिक बबन भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमय्या पितापुत्रांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान सोमय्या यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी किरीट सोमय्या हे समन्स मिळण्याच्या आधीपासून पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे महाराष्ट्राबाहेर आहेत. तसेच नील सोमय्या यांचेही ठरलेले कार्यक्रम आहेत. त्यामुळे ते दोघेही चौकशीसाठी हजर राहू शकणार नाहीत. 13 एप्रिलनंतर त्यांना चौकशीस बोलविण्यात यावे असा अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे.

सोमय्या पितापुत्र व व अन्य साथीदारांविरोधात भादंवि कलम 420, 406, 34 अन्वये ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर 11 एप्रिलला सुनावणी पार पडणार आहे.