मर्द आता एकत्र आलेत, दिवसाही वैऱ्याला काळोख दाखवण्याची हिंमत आपल्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापूरकरांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत महाविकास आघाडी सरकारच्या कामांची माहिती दिली.  त्यांनी जनतेला रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. अशी सभा घेण्याची आपली सवय नाही. कोल्हापूर ही मर्दाची भूमी आहे. आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. त्याचा आपल्याला अभिमान आहे. पृथ्वीराजच्या रुपाने कोल्हापूरने 21 वर्षांनी हा बहुमान मिळवला आहे. त्याचे मनापासून अभिनंदन. लढायचे कसे, आणि मर्दांनी कसे लढायचे, हे कोल्हापूरच्या मातीतून शिकावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ही निवडणूक आहे. राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या तर आज समोरासमोर लढणारा मर्द कोणीच नाही. मात्र, कुस्तीमध्ये भाजप उतरला तर समोरच्या पहेलवानावर प्रतीडाव करण्याऐवजी किंवा कुस्ती खेळण्याएवजी त्याच्यावर धाडी टाकेल. ईडी, सीबीआयची धाड टाक. त्यांच्यात स्वतःमध्ये धमक नाही. मात्र, मर्दाने मर्दासारखे लढावे, हे कोल्हापूरच्या मातीतून शिकावे, असे ते म्हणाले.

कोल्हापूर आपल्याला नवीन नाही. मीदेखील तुमच्यासाठी नवा नाही. माझे आजोबा आणि राजर्षी शाहू महराज यांचे ऋणानुबंधाबाबत आपण आणि शिवसेनाप्रमुखांनी वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे आपली नाळ जुळली आहे. कोल्हापूर हा भगव्याचा प्रमुख बालेकिल्ला आहे. आजही आहे आणि कायम राहील. हे काल जे कोणी आले, नानांच्या प्रचाराला फडणवीस आले. हे दोन शब्द एकत्र आले, तर काय होते ते महाराष्ट्राला माहिती आहे. आपण त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ही सभा घेतलेली नाही. मात्र, आपल्याकडे बोलण्यासरखे मुद्दे नसले की विरोधकांवर आरोप करायचे, भ्रम निर्माण करायचा आणि आपले घोडे पुढे दामटवायचे, ही त्यांची सवय झाली आहे.

आज रामनवमी आहे. समजा प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता, तर यांचे राजकारण कसे झाले असते, त्यांनी कोणत्या मुद्द्यावर राजकारण केले असते. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वात सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे धार्मिक मुद्दे, द्वेष पसरवायचा आणि स्वतःचा हेतू साध्य करायचा, हाच त्यांचा डाव असतो. काहीजण खोटे रेटून बोलतात. त्यामुळे ते खोटेच खरे आहे काय असे वाटायला लागते. आम्ही कामात कमी पडत नाही. सरकार म्हणूनही काम चांगले आहे. मात्र, आम्ही खोटे बोलण्यात कमी पडतो. कमी पडलो तरी खोटे कधीही बोलणार नाही. आम्ही स्वतःला शिवरायांचे वंशज समजतो. खोटे बोलणे आमच्या रक्तात नाही. खोटे रेटून बोलणाऱ्या विरोधकांशी आपली लढाई आहे. आपले सरकार आल्यावर कोरोनासारख्या आपत्ती सरकारच्या मागे लागल्या आहेत. चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा घटना आहेत. गेल्या वर्षी संकटात आपण कोल्हापूरला दिलासा देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी विरोधी पक्ष नेतेही आले होते. आपण त्यांना भेटूया, त्यांच्याशी चर्चा करूया. असे आपण म्हणालो. मात्र, आपण पोहचण्यासाठी ते निघण्याच्या तयारीत होते.

आम्ही हिंदुत्व सोडले नाही, सोडणारही नाही
असे वरकरणी राजकारण आपण करत नाही. महाविकास आघाडी सरकारही जे करते ते मनापासून करते. लोकसभेवेळी आमचे ठरले आहे, असे कोल्हापूरात म्हटले होते. जे ठरवले होते, ते त्यांनी करून दाखवले. शिवसेनेने विरोधकांना सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असे होत नाही, ते म्हणजे हिंदू नाही. आम्ही हिंदुत्व सोडले नाही किंवा सोडणारही नाही.

पाठीत वार करणारी आमची औलाद नाही
2014 ला युती तोडताना कशासाठी युती तोडली. आम्ही नाही तोडली. अर्ज भराच्या शेवटच्या दिवशी एकनाथ खडसे यांचा फोन आला. आपले जुळेल असे वाटत नाही. आपण स्वतंत्र लूया. त्याहीवेळी आमच्या हातात भगवा होता. त्यावेळी असे काय झाले तुम्ही स्वतंत्र लढला. हे जे घडले ते लक्षात घ्या. 2019 ला मध्ये परत युती झाली. मात्र, 2014 पेक्षा भाजपला कमी मते मिळाली. शिवसेना समोर वार करतो. समोरून वार करणारे आम्ही आहेत. आम्ही पाठीत वार कधीही करणार नाही. पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. होय तर होय म्हणू आणि ते खरे करून दाखवू. 2019 मध्ये आपला पराभव झाला. पण त्यावेळी भाजपची 40 हजार मते आपल्याला मिळाली नाही. ती कोठे गेली. ती त्यांनी फिरवली नाही काय. काँग्रेसची मते 47 वरून 91 हजार झाली. शिवसैनिक काँग्रेसला मते देणार का, असा सवाल ते करत आहोत. आम्ही जे करतो ते उघडपणे करतो. पाठिंबा आणि विरोध समोरासमोर करतो. आम्ही लपून छपून काहीकी करत नाही.

कोल्हापूरच्या विकासकामासाठी तरतूद
युती-आघाडी असताना काही गोष्टी घडतात. आता पुढे काही गोष्टी करायच्या आहेत. कोल्हापूरच्या विकासकामासाठी अर्थसंकल्पात तरतूद आहे. अंबाबाई विकासकामांसाठी निधी आहे. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी निधी दिला. खंडपीठासाठी चर्चा सुरू आहे. सत्ता आल्यानंतर हवेतील गोष्टी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. रंकाळा तलाव शुद्धीकरणासाठी योजना आहे. तो स्वच्छ करण्यात येत आहे. कल्याणमधील काळा तलाव आता स्वच्छ झाला आहे. त्याला काहीजण आता भगवा तलाव म्हणतात. पंचगंगाही स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी घोषणा नाही. प्रत्यक्ष काम सुरू आहे. अशा सर्व गोष्टी आपण करत आहोत.

हिंदुहृदयसम्राट फक्त एकच…
देशात भाजपनेही बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण लोकांनी त्यांना झिडकारले. हिंदुहृदयसम्राट म्हणल्यावर एकच चेहरा जनतेसमोर येतो. तो म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासहोब ठाकरे यांचा. हिंदू अडचणीत असताना कसलीही चिंता न करता मदतीसाठी जो धावून जातो, तो हिंदूहृदयसम्राट असतो. अशावेळी घरी बसून नंतर येत प्रतिक्रिया देणारे प्रतिक्रियासम्राट होऊ शकतात. ते हिंदुहृदसम्राट होऊ शकत नाही. तुम्हाला त्यांच्याबाबत एवढा आदर असलेत तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शहा यांनी दिलेले वचन का मोडले, याचे उत्तर दिले नाही
शिवसेनाप्रमुखांच्या पवित्र खोलीत अमित शहा यांनी दिलेले वचन का मोडले याचे उत्तर का देत नाही. नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्यास विरोध का, समृद्धी महामार्ग आपण महिन्याभरात सुरू करत आहोत. त्या रस्त्यालाही त्यांचे नाव आम्ही दिले. तुम्ही हे नव देण्याचे मोठेपण दाखवले नाही.

विरोधकांचा नकली भगव्याचा बुरखा फाडण्याची गरज
शिवरायांचा भगवा हा खरा भगवा आहे. त्यांच्या बाजूला तुमच्या सोयीने हिंरवा, निळा, पिवळा, काळा रंग लावाल, तो भगवा आम्हाला मान्य नाही. तुमचा भगवा खरा भगवा नाही. शिवरायांचा, साधूसतांचा भगवा हाच खरा भगवा आहे. 1966 पासून शिवसेनेने आपला झेंडा, विचार, रंग किंवा नेता कधीही बदलला नाही. आमच्या सर्व होल्डिंगवर शिवसेनाप्रमुखच आहेत. तुमचा जनसंघापासून आतापर्यंतचा प्रवास आठवा. आज त्यांच्या किती होल्डिंगवर अटलजी, आडवणी कुठेही दिसत नाही. आपल्या बाजूला असलेल्या बेळगावात भगवा तुडवला जातोय. तुम्ही किती वेळा मराठी माणासोसबत रस्तावर उतरला आहोत. आतापर्यंत शिवसेनाच मराठी माणसाच्या रक्षणासाठी उतरली आहे. याआधीचे पालकमंत्री असलेले त्यांना मराठी, भाषा, राज्य कसलाच अभिमान नाही. अशी माणसे आपल्यावर लादली. निवडणूक आली की तिथे कर नाटक आणि रेट पुढे असे त्यांचे चालते. त्यांच्या सर्व आरोपांना मी विधानसभेतच उत्तर दिले आहे.

कोरोना काळात मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. त्याकाळी राज्यात इपिडेमिक अॅक्ट आणि केंद्राने डिझास्टर मॅनेजमेंट अॅक्ट लावला होता. या काळात आपत्ती काळातील कामे आणि उपाययोजनांसाठी टेंडरची गरज नसते. असे असूनही आम्ही कोरोना काळात टेंडरशिवाय एकही काम केल नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

होय,शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार
शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार, असा सवाल ते करत आहेत. आम्ही नाटक नाही करत. काँग्रेसला मतदान करणे पाप नाही. हे जर पाप असेल तर मेहबूबा मुफ्तींसोबत बसणे तुमचे पुण्य आहे काय, त्या वंदे मतारम, भारत माती की जय मणाल्या होत्या काय, तुम्ही त्यांच्यासोबत गेलात तिथेच तुमचे धर्म, विचार भ्रष्ट झाले. सत्तेसाठी तुम्ही त्यांच्यासोबत गेलात. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना तुमच्या एका दलालावर विक्रांतच्या पैशासाठी आरोप होत आहेत. त्याचीही तुम्ही बाजू घेतात. विकांत आपला अभिमान आहे. त्याचे शैर्य जगाला कळायला हवे. देशाच्या नावाने तुम्ही पैसे लाटता, ही शरमेची बाब आहे, असा आरोपही त्यांनी केला.

रेशन मोफत दिले पण ते शिजवायचे कसे?
फडणवीस म्हणाले कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मोफत रेशन दिले. ते दिले पण शिजवायचे की कच्चे खायचे आजचे सिलिंडरचे भाव परवडतात काय, तुमची फसवी उज्ज्वला योजना सुरू आहे काय, रेशन मोफत दिले पण ते जनतेच्या पैशांतून दिले. दिलेले रेशन शिजवायचे कसे ते सांगा, कालच्या भाषणत महागाईबाबत ते काहीच बोलले नाही. ते म्हणातात राज्याने कर कमी करावा, आम्ही कमी करायचे तुम्ही वाढवायचे. आमचा हक्काचा जीएसटी रखडवला आहे. त्यांना का म्हणून मते द्यायची, असा सवालही त्यांनी केला.

बेळगाव महापालिकेवरचा भगवा कोणी उतरवला?
राज्याच्या विकासासाठी आम्ही ही आघाडी केली आहे. शिवाजी महाराजांपासून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहोत. समोरून प्रेमाने भेटायला आले तर त्याला प्रेमाने भेटायचे. अफझलखानही प्रेमाने मिठी मारण्यासाठी आला तर मिठी मारायची, पण त्याने पाठीत वार केला तर आपण समोरून वार करायचा .पाठीत वार करणारी आमची अफझलखानाची औलाद नाही. शिवाजी महाराजांसारखी समोरून वार करणारी आमची औलाद आहे. हे आम्हाला महाराजांनी शिकवले आहे. लाल महालात घुसलेल्या शाहिस्तेखानाला परत पाठवणारी आमची मातृभूमी आहे. बेळगाव महापालिकेवरचा भगवा कोणी उतरवला आणि तिथे नकली भगवा कोणी फडकवला, असा सवालही त्यांनी केला.

त्यांना काय मद्यप्रदेश म्हणायचे का?
महाविकास आघाडी लेच्यापेच्यांची नाही. आम्ही मराठी मातीतील लेकरे आमहोत .आमच्या नादी लागू नका. खोटे नाटे सांगून इतर राज्यांत तुमचे राजकारण फळत असेल, मात्र महाराष्ट्रात तसे होणार नाही, हा विश्वास आपल्याला आहे. आपण विकासच्या अनेक गोष्टी करत आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची योजना आणली. अनेक आपत्ती असतानाही आपण विकास करत आहोत. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र केले, असाही आरोप केला. वाईन चणेफुटाणे वाल्यांकडे मिळत नाही. सुपरमार्केटमध्येच आपण परवानगी दिली आहे. आपल्यापेक्षा मध्यप्रदेश पुढे आहे. त्यांना काय मद्यप्रदेश म्हणायचे का, असा सवालही त्यांनी केला.

आज तुम्हाला ठरवायला हवे, तुम्ही विचार करायला हवा. हा सरकारचा प्रयोग आपल्याला यशस्वी करायचा आहे. कडवट आणि कट्टर शिवसैनिक आता निवडणुकीत आहे. आपला उमेदवार निवडून आल्यावर एकत्रित काम करा. आपण वैरी किती बघितलेत. दिवस आणि रात्र वैऱ्याची असली तरी मर्द एकवटतात तिथे त्यांना काळोख दाखवण्याची हिंमत आपल्यात आहे. आपण कोल्हापूरवरचा भगवा झेंडा आणि ठसा कधीही पूसू देणार नाही. हे तेज आपण टिकवणारच,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. फक्त गाफील राहू नका. आपले मतदार मतदान केंद्रापर्यंत येत मतदान कसे करतील याकडे लक्ष द्या. तुम्ही गाफील राहिला नाहीत, तर विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.