
नगर जिल्ह्यात जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची जोरदार तयारी सुरू आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे विस्कळीत झालेली शिक्षणाची गाडी रुळावर आणण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी पहिलीची शाळाप्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार 44 हजार 690 विद्यार्थी हे पहिली प्रवेशासाठी पात्र असून, येत्या 25 मार्चपर्यंत या सर्वांचा शाळाप्रवेश करून घेण्यात येणार आहे.
कोरोनातून सावरल्यानंतर आणि जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी तालुका, केंद्रपातळीवर शाळाप्रवेश उत्सवासाठी मुख्याध्यापक, पहिलीत अध्यापन करणारे शिक्षक, अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून, आता पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांशी संपर्क साधून त्यांना प्रवेशासाठी तयार करण्यात येत आहे. डिसेंबर 2022पर्यंत किमान सहा वर्षे पूर्ण करणारा विद्यार्थी पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असून, असे जिल्ह्यात 44 हजार 690 विद्यार्थी आहेत.
हे सर्व विद्यार्थी एक तर जिल्हा परिषदेच्या अथवा अन्य खासगी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतात की नाही, याची खातरजमा जिल्हा परिषद शिक्षण विभाग करणार आहे. शाळा प्रवेशासाठी पात्र असणारा एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी आधी 11 मार्च, त्यानंतर आठ दिवसांनी 18 मार्चला जिल्हाभरातून तालुकानिहाय माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर 20 मार्चपर्यंत पहिलीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून घेण्यात येणार असून, त्यानंतर शाळाप्रवेशाचा 25 मार्चला अंतिम अहवाल तयार करण्यात येणार आहे. जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी शिक्षण विभागाने तयार सुरू केली असून, पहिल्या टप्प्यात शाळाप्रवेश पूर्ण करून घेण्यात येणार आहे.
तालुका विद्यार्थी
अकोले 2801
जामखेड 1420
कर्जत 2297
कोपरगाव 2404
नगर 2946
नेवासा 3725
पारनेर 2598
पाथर्डी 2389
राहाता 3052
राहुरी 3390
संगमनेर 4084
शेवगाव 2461
श्रीगोंदा 2963
श्रीरामपूर 2270
मनपा 6160




























































