मालवण किनारपट्टीवर पोलिसांचे ‘सागर कवच’ अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सागरी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने दर काही महिन्यांनी आयोजित केले जाणारे ‘सागर कवच’ अभियान 12 व 13 एप्रिल रोजी मालवण किनारपट्टी भागात प्रामुख्याने राबवले जात आहे. तब्बल 36 तास किनारपट्टीवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे अभियान सुरू राहणार आहे.

सागरी गस्त व किनारपट्टी भागात गस्त, ठिकठिकाणी नाकाबंदी व पोलिसांची गस्त राहणार आहे. मंगळवारी सकाळी या मोहिमेचा शुभारंभ झाला असून बुधवारी सायंकाळी सांगता होणार आहे. पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण सागरी किनारपट्टी भागात एकाचवेळी हे अभियान राबवले जाते.

मालवण पोलिसांनी सागर कवच अभियानाच्या अनुषंगाने देवबाग, मोबार तसेच तोंडवळी तळाशील येथे मच्छीमार, ग्रामस्थ, सागर मित्र यांची मीटिंग घेऊन त्यांना सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर सूचना केल्या. तसेच सध्या सुरु असलेल्या सागर कवच अभियानाच्या अनुषंगाने सतर्क राहण्याबाबत सांगितले. काही संशयास्पद निदर्शनास आल्यास तात्काळ 1093 या टोल फ्री नंबर वर संपर्क करण्याबाबत आवाहन मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.