
सोळाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पवई येथे घडली. शिवम श्रीकांत पांडा असे मृताचे नाव असून पवई पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
शिवम हा पवईच्या रहेजा बिस्त या इमारतीत कुटुंबीयांसोबत राहत होता. दहावीत शिकणाऱया शिवमचा एक पेपर बाकी असल्याने त्याने रविवारी संपूर्ण रात्र जागून अभ्यास केला. सोमवारी दुपारी जेवल्यानंतर तो आराम करण्यासाठी बेडरूममध्ये गेला, तेव्हा त्याचे आईवडील हॉलमध्ये होते. काही वेळाने शिवमच्या आईने बेडरूमचा दरवाजा ठोकला. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने तिला संशय आला. त्याच्या आईने इमारतीखालील गॅलरीत पाहिले असता तो लॉनमध्ये पडलेला होता. काहीच वेळात शिवमचे नातेवाईक खाली गेले. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
शिवम पडल्याची माहिती इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने पवई पोलिसांना दिली. त्यानंतर पवई पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी शिवमच्या कुटुंबीयांचा जबाब नोंदवला आहे. शिवमच्या बेडरूमच्या बाहेर एसीचा पंखा आहे. त्यावर तो अनेकदा बसून पह्नवर बोलत असायचा असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. सोमवारीदेखील शिवम त्या पंख्यावर बसला असावा. बोलता बोलता त्याचा पह्न खाली पडल्याने पह्नच्या नादात शिवम सोळाव्या मजल्यावरून खाली पडला असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळापासून काही अंतरावरच शिवमचा मोबाईल आढळून आला आहे. शिवमचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंता गायकवाड यांनी सांगितले.























































