
जमिनीवर स्वतःचा ताबा दाखविण्यासाठी न्यायालयात बनावट ‘आठ अ’ चा उतारा सादर करीत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मार्च 2018 ते एप्रिल 2022 या कालावधीत पुणे जिल्ह्यातील जांभूळवाडी, कोळेवाडी हवेली या ठिकाणी घडली आहे.
या प्रकरणी बाळासाहेब बबन जांभळे, सुजाता जांभळे, जालींदर जांभळे, वनिता जांभळे, प्रभाकर जांभळे (सर्व रा. जांभुळवाडी, ता. हवेली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय श्रीहरी जांभळे (वय 32 रा. आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभूळवाडीमधील सर्वे नंबर 67 मिळकतीच्या सातबाऱ्यावर अजय जांभळे आणि कुटुंबीयांचा मालकी हक्क आहे. त्यामध्ये स्वतःचा ताबा दाखवण्यासाठी बाळासाहेब जांभळे, जालिंदर जांभळे आणि माजी सरपंच वनिता जांभळे यांच्यासह इतरांनी ग्रामपंचायत जांभुळवाडी कोळेवाडी येथे स्वतःच्या नावावर घर असल्याबाबत खोटा ‘आठ अ’चा उतारा बनविला.
त्यानंतर अजय यांच्या जमिनीची मोजणी होऊ नये, यासाठी आरोपींनी 2018मध्ये भूमी अभिलेख कार्यालयात तो खोटा उतारा खरा भासवला. संबंधित उताऱ्याचा गैरवापर करीत 18 जानेवारी 2022 रोजी पुण्यातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. उताऱ्यावरील 14 एकर 18.66 आर मिळकतीपैकी 10 एकर 20 आर जमिनीवर बाळासाहेब, सुजाता, जालिंदर, वनिता, प्रभाकर यांचाच ताबा असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यासाठी त्यांनी खोटा आणि बनावट नमुना ‘आठ अ’चा उतारा दाखवून न्यायालयासह अजय जांभळे यांची फसवणूक केली.
जांभुळवाडीतील सर्वे 67 मध्ये आरोपींचे घर नसतानाही त्यांनी बनावट आठ अ उताऱ्याद्वारे भूमी अभिलेख कार्यालयात कागदपत्रे सादर केली. त्याशिवाय दिवाणी न्यायालयातही उतारा सादर करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.
– वैभव गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ




























































