राज्यात बिअरच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात बिअरच्या विक्रीत 14 टक्क्यांनी वाढ झाली असून वाईन विक्रीदेखील हळुवार वाढत असल्याचे चित्र आहे, तर एकूण महसुलातदेखील 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात देशी दारूची 4 हजार 159, विदेशी दारूची 1 हजार 685, बिअरची 4 हजार 947 आणि वाईनची 31 दुकाने आहेत. साधारणपणे राज्यात दरवर्षी 33. 38 कोटी लिटर देशी दारूचा, 20 कोटी हिंदुस्थानी बनावटीचा, परदेशी मद्य असा मिळून 85 कोटी लिटर असा खप आहे. राज्याच्या तिजोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून महसूल जमा होतो. कोविडमुळे राज्यात दारूची दुकाने काही दिवस बंद होती. दुकाने बंद असल्याने त्याचा परिणाम महसुलावर होत होता. कोविड काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोच मद्य पोहचविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नागरिक घरी बसून वाईन, व्हिस्कीची ऑर्डर करत होते. कोविड काळात थंड बिअर प्यायल्यास सर्दी होईल. सर्दी झाल्यास कोविड होईल अशी अनेकांना मनात भीती होती. भीतीपोटी अनेकांनी बिअर पिणे बंद केले होते. बिअरऐवजी व्हिस्की आणि वाईनला अनेकांनी प्राधान्य दिले होते. अखेर कोविडची स्थिती राज्यात सुधारत गेल्यानंतर निर्बंध हळुवार हटविण्यात आले होते. त्यानंतर बार, परमिट रूममध्ये बिअर, व्हिस्की पिणाऱयांची संख्या वाढू लागली आहे. खासकरून मार्च ते जून या काळात राज्यात बिअरची विक्री अधिक असते. उकाडय़ात नागरिक व्हिस्कीपेक्षा बिअर पिणे पसंत करतात. त्यामुळे या काळात बिअरचा खप वाढलेला असतो.

 आकडेवारी  

वर्ष खप    लाख लिटर

2020-21   2011.93

2021-22    2312. 81

गुन्हे नोंद करण्याचे प्रमाण वाढले 

आयुक्त कांतीलाल उमाप यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर दारू तस्करांविरोधात गुन्हे नोंद करून कारवाईचे प्रमाण वाढले आहे. यंदाच्या वर्षी अटक आरोपींचे प्रमाण 19 टक्क्यांनी वाढले आहे. ‘ऑपरेशन ऑलआऊट’, चेकनाक्यावरील गस्त यामुळे परराज्यांतून येणाऱया अवैध दारूचे प्रमाण कमी झाले आहे.