केडगाव हत्याकांड – विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. अजय मिसर यांची नियुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यातील महापालिका पोटनिवडणुकीच्या काळात केडगाव परिसरात घडलेल्या शिवसैनिकांच्या हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या कायदा व न्याय विभागाच्या सेक्शन ऑफिसर वैशाली बोरुडे यांनी नियुक्ती आदेश दिला आहे.

केडगावात 7 एप्रिल 2018 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे व संजय कोतकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. या घटनेत पोलिसांनी सातजणांना अटक केली आहे. याप्रकरणी सीआयडीने काही जणांचे जबाब घेतले आहेत.

या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व्हावी व सीआयडीमार्फत तपास पूर्ण व्हावा, या मागणीसाठी गेल्या महिन्यात कोतकर व ठुबे कुटुंबीयांनी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषण केले होते. याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी अपर मुख्य सचिवांची बैठक बोलावली. यात ऍड. अजय मिसर यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, सीआयडी अधीक्षक श्रीकांत धावरे आणि तपास अधिकारी नारायण सस्ते यांना तपासाबाबत काळजी घेण्याची सूचना केली होती.