
जगातील सर्वात वयोवृद्ध गोरीला अशी फटोऊ नावाच्या मादी गोरीलाची ओळख आहे. जर्मनीची राजधानी बर्लिनच्या प्राणी संग्रहालयात वास्तव्य असलेल्या या गोरीलाने नुकताच आपला 65 वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला आहे. हा व्हिडीओ बर्लिन प्राणी संग्रहालयाच्या ट्विटरवरून शेअर केला आहे.
साधारणपणे गोरीला 35 ते 40 वर्षे जगतात, परंतु या गोरीलाचे इतके वय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्राणी संग्रहालयाने फटोऊचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा केला. त्याच्यासाठी खास केक तयार केला होता. त्यावर लाल आणि करडय़ा रंगाच्या कँडीने ‘65’ असे लिहिले होते. फटोऊ हिनेही आवडीने हा केक फस्त केला. या मादीचा जन्म 1957 मध्ये झाला होता. 1959 मध्ये ही मादी बर्लिनमध्ये आणली होती.


























































