
कश्मीर खोऱयात सुरक्षा बलांच्या कारवाईच्या मोहिमेमुळे चवताळलेल्या दहशतवाद्यांनी ‘टार्गेट किलिंग’चे सत्र सुरू ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी राजपूत कुटुंबातील एका चालकाची हत्या केल्यानंतर शुक्रवारी बारामुल्ला जिह्यात सरपंचाची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली. सामान्य नागरिकांवरील लागोपाठच्या हल्ल्यांमुळे कश्मीर खोऱयात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांनी शुक्रवारी सायंकाळी पट्टण शहरात अपक्ष सरपंच मंजूर अहमद बांगरू यांच्यावर गोळय़ा झाडल्या. त्यात गंभीर जखमी झालेले बांगरू यांचा रुग्णालयात नेले जात असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. बुधवारी कुलगाम जिह्यात दहशतवाद्यांनी सतीश कुमार नावाच्या चालकाची गोळय़ा झाडून हत्या केली होती. कश्मीर खोऱयात लष्कराने दहशतवाद्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांकडून नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे.






















































