मराठवाडय़ातील गाजलेली साहित्य संमेलने!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>प्रशांत गौतम

शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱया 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संख्येतील उदगीरसह आठ संमेलने मराठवाडय़ाच्या वाटय़ाला आली. यातील रंजक बाब अशी की, मराठवाडय़ात झालेल्या सातही संमेलनांचे अध्यक्षपद हे मराठवाडय़ाबाहेरील प्रतिभावंत सारस्वतांनी भूषवले आणि मराठवाडय़ातील पाच लेखकांना अध्यक्षपदाचा सन्मान बृहन्महाराष्ट्रात लाभला. यात सन्माननीय अपवाद फक्त नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांचा. मराठवाडय़ाचे भूमिपुत्र असलेले सेवानिवृत्त सनदी अधिकारी व लेखक अशी ओळख त्यांची आहे. यानिमित्ताने मराठवाडय़ात जी सात संमेलने झाली, नुसती झाली असे नाही, तर गाजली, वाजली आणि संस्मरणीय ठरली आहेत.

गतवर्षी डिसेंबर 2021च्या महिन्यात नाशकात 94 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन पार पडले. त्याच संमेलनाच्या समारोपात उदगीर येथे 95 व्या संमेलनाची निश्चिती झाली. अवघ्या चार महिन्यांत साहित्य संमेलनाचा मंडप सारस्वतांच्या आणि रसिक, वाचकांच्या स्वागतासाठी नव्या जोमाने सज्ज झाला. तयारीला कमी वेळ असताना स्थळ निश्चिती, अध्यक्षांची निवड यापासून ते कार्यक्रमाचे नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले. त्या संमेलनाचा शुभारंभ दि. 22 एप्रिल रोजी उदगीर येथील उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणावर होतो आहे. ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याहस्ते उद्घाटन आणि समारोपात राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच सारस्वतांची मांदियाळी जमणार आहे.

संभाजीनगर – 1957 आणि 2004

1957चा काळ संयुक्त महाराष्ट्र चळवळीने विलक्षण भारवलेला होता. अशा वातावरणात महाराष्ट्र साहित्य परिषदेने 39 वे संमेलन प्रख्यात लघुनिबंधकार प्रा.अनंत काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित केले. उद्घाटक रावसाहेब र.लु.जोशी तर स्वागताध्यक्ष देविसिंग चौहान होते. संयुक्त महाराष्ट्राचा विषय स्वागताध्यक्षांनी आपल्या भाषणात घेऊ नये असे त्यांच्यावर दडपण होते. त्यांनी मौन बाळगावे, भूमिका मांडू नये असेही त्यांना सांगण्यात आले होते. मात्र उद्घाटक व संमेलनाध्यक्षांनी आपल्या भाषणात या ज्वलंत विषयाला वाचा फोडली. नंतर हे प्रकरण निवळले. या संमेलनात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार आणि काकासाहेब गाडगीळ यांची तडाखेबंद भाषणं गाजली. वसंत बापट, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर या त्रिकुटाचे काव्यगायनही बहरले. त्यानंतर तब्बल 25 वर्षांनी 2004 साली प्रा. रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे 77वे संमेलन देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणावर भरले होते. त्यानिमित्ताने 1957 च्या संमेलनाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्या संमेलनाचे प्रत्यक्ष साक्षीदार व सहभागी असलेल्या प्रा.प्रभाकर मांडे, प्राचार्य भगवंत देशमुख, प्रा. तु.शं. कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत धांडे, प्रा. चंद्रकांत भालेराव, श्री.दि. इनामदार आणि सुहासिनी इर्लेकर यांच्याशी संवाद साधला होता. संभाजी नगरातील 1957 च्या संमेलनाच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.

अंबाजोगाई – 1983

अंबाजोगाई येथे 1983 साली साहित्य महामंडळाचे 50 वे साहित्य संमेलन प्रख्यात कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कथाकथनात माडगूळकर यांच्यासह वसंत सबनीस, प्राचार्य रा.रं. बोराडे यांनी बहार उडवून दिली. राम नगरकरांच्या ‘रामनगरी’ने धमाल उडवली. कविसंमेलनाचे अध्यक्ष वसंत बापट यांच्यासह ना.धों. महानोर, मधुकर केचे यांनी कविसंमेलन गाजवले. केचे यांच्या विडंबन काव्यास रसिकांनी डोक्यावर घेतले. समारोपात ‘टिळक – आगरकर’ हे नाटक झाले. त्याला तुफान गर्दी उसळली. नाटक बघायला मिळाले नाही म्हणून संतप्त नाटय़ रसिकांनी नाटक कंपनीच्या गाडीवर दगडफेक केली, परंतु पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने प्रकरण थोडक्यात निभावले.

नांदेड – 1985

1983 नंतर अवघ्या दोन वर्षांनी मराठवाडय़ात साहित्य संमेलन आले. नांदेड नगरीत गाजलेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते कथाकार शंकर पाटील आणि स्वागताध्यक्ष होते श्यामराव कदम. मधल्या काळात प्राचार्य नरहर कुरुंदकर नावाचा ज्ञानसूर्य अकाली अस्ताला गेला. त्यांच्या निधनाचे सावट या 59 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनावर होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्र्ााr जोशी, शंकरराव किर्लोस्कर हे कुरुंदकरांवरील प्रेमापोटी संमेलनास उपस्थित होते. तर्कतीर्थ तर संमेलनाचे उद्घाटक होते. प्रा. दत्ता भगत संमेलनाचे सूत्रधार, तर ना.धों. महानोर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. ‘खान्देशचा मळा आणि बहिणाबाईचा गळा’ हा कार्यक्रम फ.मुं. शिंदे, प्रा. शेख शफी, अशोक जोंधळे, सौ. आशा जोंधळे यांनी पहिल्यांदा सादर केला, जो आजही संस्मरणीय वाटावा एवढा ताजा आहे. याच संमेलनातील निमंत्रित कविसंमेलनात मिरजचे अंध कवी राम गोसावी यांच्या कवितेस भरभरून प्रतिसाद मिळाला होता.

परभणी – 1995

1985 नंतर बरोबर दहा वर्षांनी परभणीत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली 68वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन झाले. अशोक वाजपेयी उद्घाटक होते. संमेलनाचे देखणे आयोजन, दर्जेदार कार्यक्रम, स्वादिष्ट जेवण, पुस्तकांची विक्रमी विक्री आणि शिवाजी महाविद्यालयात तिन्ही दिवस रसिकांची लाभलेली उदंड गर्दी अशा अनेक गुणविशेषांनी परभणीकरांनी संमेलनाचा एक आदर्श पायंडा घालून दिला. संयोजक मंडळीतील स्वागताध्यक्ष रावसाहेब जामकर आणि प्रमुख कार्यवाह देविदास कुलकर्णी आज आपल्यात नाहीत; पण त्यांच्यासोबत लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासारख्या सनदी अधिकाऱयाने, स्थानिक साहित्यप्रेमींनी संमेलन यशस्वी केले.

परळी – 1998

परभणीनंतर तीन वर्षांनी परळी येथे संमेलन झाले. गोपीनाथ मुंडे यांनी 71व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून मोठी भूमिका बजावली. प्रा.द.मा.मिरासदार या संमेलनाचे अध्यक्ष होते, तर समारोपासाठी ज्ञानपीठ विजेत्या महाश्वेतादेवी उपस्थित होत्या. संमेलनाच्या आदल्या दिवशी रेल्वेचा भीषण अपघात, दुसऱया दिवशी वादळी वाऱयासह पाऊस अशा संकटांवर मात करीत मुंडे यांनी संमेलन यशस्वी करून दाखवले. प्रा.सुधीर रसाळ साहित्य महामंडळाचे अध्यक्ष होते. एकूणच, हेही संमेलन गाजले व चर्चेतही राहिले.

धाराशीव – 2020

93 व्या अ.भा.मराठी साहित्य साहित्य संमेलन आयोजनाचा योग धाराशीवकरांना 2020 साली मिळाला. यजमानपद मिळावे यासाठी धाराशीवकरांनी साहित्य महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर संयोजकांच्या प्रयत्नांस यश लाभले. फादर फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाचे अध्यक्ष झाले खरे; पण प्रकृती ठीक नसल्याने दोन दिवस थांबून समारोपाच्या आधीच मुंबईला परत गेले. अध्यक्षांच्या गैरहजेरीत सर्व कार्यक्रम व समारोप पार पडला. तेवढा अपवाद सोडला तर या संमेलनात ख्रिस्ती – मराठी बांधवांनी एकत्र येऊन मायमराठीचा उत्सव दणक्यात साजरा केला.

उदगीर – 2022

उदगीर येथे भरणारे 95 वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन हे मराठवाडय़ात भरणारे आठवे संमेलन होय आणि साहित्य महामंडळाच्या कार्यकाळातील होणारेही शेवटचे संमेलन आहे. महामंडळ आपल्या कार्यकाळात तीन संमेलपंचे आयोजन करीत असते. कोरोना प्रादुर्भावामुळे नाशिकचे संमेलन आठ महिने विलंबाने झाले आणि उदगीरचे संमेलन अवघ्या चार महिन्यांत उभे राहिले. महामंडळाची मुदत मार्च 2022 मध्ये संपली. मग हे संमेलन मराठवाडय़ाकडे की महामंडळाचा पदभार घेणाऱया मुंबईकडे हा प्रश्न संमेलन काळात ऐरणीवर आला असला तरी तो विषय निवळला. उदगीर संमेलनानंतर महामंडळ मुंबईकडे जाणार आहे. ते मराठवाडय़ात परत पुन्हा नऊ वर्षांनीच परत येणार आहे. हे खरे असले तरी उदगीरकर मात्र सारस्वतांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.