शिल्पवैभव – जैन शिल्पवैभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंजिरी भालेराव

धार्मिक शिल्प म्हणजे सर्वसामान्यतः देव-देवतांची शिल्पे असे आपण समजतो. पण जैन धर्मातील देवतांची संकल्पना थोडी वेगळी आहे. यामध्ये तीर्थंकरांपेक्षा देवतांचे स्थान हे थोडे खालच्या स्तरावरचे आहे. जैन दैवतशास्त्रात सर्वात महत्त्वाचे स्थान आहे ते म्हणजे तीर्थंकरांना. असे एकूण चोवीस तीर्थंकर होऊन गेले असे जैन परंपरा मानते.

हिंदुस्थानी धर्म परंपरांमध्ये वैदिक धर्मातील यज्ञ परंपरांना विरोध करणारे जे दोन प्रवाह अस्तित्वात आले त्यामध्ये जैन आणि बौद्ध परंपरांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. काळाच्या ओघात या दोन्ही धर्मांनी आपापले दैवतशास्त्र विकसित केले होते. त्या संप्रदायाच्या उपासकांसाठी अतिशय देखण्या शिल्पांची निर्मितीही काळाच्या ओघात झालेली आपल्याला दिसते.

जैन धर्म ईश्वरावर विश्वास ठेवत नाही. तसेच ईश्वराने सृष्टी निर्माण केली असे मानत नाही. ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला, ते जिन. त्यांचे अनुयायी हे जैन. त्यांनी सांगितलेल्या धर्मालाही जैन असेच म्हटले जाते. या धर्मातील महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे तीर्थंकर. असे एकूण चोवीस तीर्थंकर होऊन गेले असे जैन परंपरा मानते. यामध्ये आदिनाथ किंवा ऋषभदेव हे प्रथम तीर्थंकर होते. तेविसावे तीर्थंकर हे पार्श्वनाथ आणि त्यानंतर चोविसावे हे महावीर असे झाले. जैन धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन पंथ जरी निर्माण झाले तरी हेच चोवीस तीर्थंकर दोन्ही परंपरा मानतात. या तीर्थंकरांशिवाय विविध शासनदेवता, यक्ष, यक्षी इ. पूजनीय व्यक्तींचा अंतर्भाव जैन देवतासंघात होतो. पण यापैकी काही देवता अमंगल स्वरूपाच्याही असतात. मुळात अमंगल आणि नंतर उपासना केल्यावर मंगल स्वरूपाच्या अशा काही देवता तीर्थकरांनाही त्रास देतात. यक्षपूजासुद्धा जैन धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली गेली आहे. बरेचदा हे यक्ष गृहस्थाश्रमी श्रावकांच्या पूजा अर्चांमध्ये दिसून येतात. यामध्ये व्यापारी जनांचा आदरणीय असा मणिभद्र यक्ष याचाही समावेश होतो.

असाच एक अजून देव म्हणजे हरिनैगमेष. खरे तर या देवतेला श्वेतांबर जैन धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. त्याचा संबंध महावीराच्या जन्माशी लावलेला दिसतो. या देवतेचे तोंड बकऱयाचे आणि शरीर मानवाचे असते. ज्यावेळेस महावीराचा गर्भ देवनंदा ब्राह्मणीच्या शरीरात होता त्यावेळी इंद्राच्या आज्ञेने हरिनैगमेष याने तो त्रिशला या क्षत्राणीच्या शरीरात ठेवला. प्राचीन काळी या देवतेची उपासना हिंदुस्थानात सर्व धर्मांत केली जात असावी. तशीच ती जैन धर्मातही होत होती. मुळात लहान मुलांना उपद्रव देणारा हा देव त्याच्या उपासनेनंतर मुलांचा रक्षक बनला होता असे दिसते. याशिवाय महिला संतानप्राप्तीसाठी या देवाची पूजा करत असत. याची अनेक शिल्पे मथुरा आणि आसपासच्या भागात मिळाली आहेत. त्याची पत्नी नैगमेषी हिची शिल्पेसुद्धा तिथे सापडली आहेत.

तीर्थंकरांच्या आयुष्यात घडणाऱया पाच घटनांना कल्याणक असे नाव आहे. त्या म्हणजे आईच्या पोटात प्रवेश झाल्यावर गर्भकल्याणक (च्यवकल्याणक), जन्मकल्याणक, तपकल्याणक (दीक्षाकल्याणक), ज्ञानकल्याणक आणि निर्वाणकल्याणक. या सर्व घटनांचे शिल्पात अंकन दिसत नाही, पण तीर्थंकरांना केवल ज्ञान मिळाल्यावर ते जेव्हा पहिले प्रवचन देतात त्या घटनेचे मात्र अंकन दिसते. या घटनेचे निदर्शक म्हणून सर्वतोभद्र (चारही बाजूंनी प्रवेशद्वार असलेले) मंदिर तयार केलेले दिसते ज्यामधले तीर्थंकर सर्वांना दिसू शकतात. याव्यतिरिक्त एकाच दगडात कोरलेल्या 24 तीर्थंकरांच्या मूर्ती चोविसी नावाने प्रसिद्ध आहेत. तीर्थंकरांच्या बरोबर यक्ष आणि यक्षी यांच्या जोडय़ा आढळतात. सामान्य उपासकांच्या आशा आकांक्षा तीर्थंकर नाही तर हे यक्ष-यक्षी पूर्ण करतात. आदिनाथ यांचे गोमुख आणि चक्रेश्वरी, नेमीनाथ यांचे सर्वानुभूती आणि अंबिका, पार्श्वनाथाचे धरणेन्द्र आणि पद्मावती इ. मुख्यतः शिल्पांमध्ये आढळतात. पार्श्वनाथाप्रमाणेच धरणेन्द्र आणि पद्मावती यांच्या डोक्यावरही सर्पछत्र दिसते.

जैन मूर्तींमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेली मूर्ती म्हणजे श्रवणबेळगोळ येथील बाहुबली किंवा गोम्मटेश्वर याची! या मूर्ती अनेक जैन मंदिरांमधूनही पाहायला मिळतात. अशा प्रकारे जैन शिल्पांमध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर विविधता पाहायला मिळते.

हिंदुस्थानात उदयाला येऊन लोकप्रिय झालेल्या सर्व धर्मांच्या अनुयायांनी मोठय़ा प्रमाणावर सगुण साकार मूर्तींची आणि आनुषंगिक शिल्पांची निर्मिती केली. त्यापैकी काहींची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. यानंतर ही मालिका विराम घेत आहे.

 [email protected]