‘खरं खरं सांग’ एसी का बिघडला? रवींद्र नाटय़मंदिरातील रविवारचा प्रयोग भंगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रभादेवीतील रवींद्र नाटय़मंदिरातील सोयीसुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे. अस्वच्छ प्रसाधनगृह, तुटलेल्या खुर्च्या, मेकअपरूमची दुरवस्था, बंद पडलेला एसी अशा येथील गैरसोयींचा फटका कलाकारांना बसतोय. याबाबत सोशल मीडियावरून अनेकदा कलाकारांनी आवाज उठवला असला तरी नाटय़गृह व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणामुळे परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. व्यवस्थापनाच्या याच बेजबाबदारपणामुळे रविवारी या नाटय़गृहातील ‘खरं खरं सांग’ या नाटकाचा प्रयोग भंगला. नाटय़गृहातील एसी बंद असल्याची कल्पना निर्मात्यांना न दिल्यामुळे कलाकारांवर नाईलाजास्तव उकाडय़ातच प्रयोग करण्याची वेळ आली. उकाडा असह्य झाल्यामुळे काही प्रेक्षकांनी गोंधळ घातला. शेवटी काही प्रेक्षक तिकिटाचे पैसे परत घेऊन निघून गेले. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिच्या फेसबुक पोस्टनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

रविवारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ऋजुता म्हणाली,  आज आमचा प्रयोग रवींद्र नाटय़मंदिरात होता. नाटय़गृहाच्या एसीमध्ये बिघाड झाल्याची कल्पना आम्हाला नव्हती, उलट एसी चालू करत आहोत अशी आम्हाला हमी दिली आणि मग आम्ही प्रयोग सुरू केला. अर्थात परफॉर्म करताना आम्हाला तसेच प्रेक्षकांनाही  उकडत होते. अतिउकाडय़ामुळे चालू प्रयोगात आरडाओरड सुरू झाली.

पुढे ती म्हणाली, एसी चालू हवा हा मुद्दा  बरोबर असला तरी त्यासाठी कलाकारांना अथवा निर्मात्याला जबाबदार धरणं हे चुकीचं होतं. आमच्या सगळ्यांच्या वतीने आनंद इंगळे हे माफी मागत होते तरीदेखील काही प्रेक्षकांना स्वतःला आवरता आलं नाही. हळूहळू प्रकरण शांत झालं आणि प्रेक्षकांनी प्रयोग सुरू करायचा आग्रह धरला. 500-600 प्रेक्षकांपैकी साधारण 60-70 प्रेक्षक घरी परतले. दरम्यान, या प्रकरणात नाटय़गृहाची चूक असून ती लवकरात लवकर सुधारावी अशी अपेक्षा ऋजुताने व्यक्त केली.

नाटय़गृह व्यवस्थापनाचा नाकर्तेपणा  

ऋजुताच्या पोस्टनंतर अभिनेता आस्ताद काळे यानेदेखील या नाटय़गृहातील असुविधांचा पाढाच वाचला. रवींद्र नाटय़मंदिराचे भाडे इतके आहे की, येथे प्रयोग करताना विचार करावा लागतो. इथली व्हीआयपी रूम नावालाच आहे. स्वच्छतागृहाचा दुर्गंध मेकअपरूमपर्यंत येतो. मेकअपरूममध्ये कायम पाणी भरलेले असते. हा प्रकार संतापजनक असून याला नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. हे चित्र वेळीच बदलले नाही तर सर्वांना एकत्र येऊन त्याविरोधात आवाज उठवावा लागेल, असा इशाराही त्याने दिला.