बुलेटस्वाराने दिली धडक, बसच्या चाकाखाली सापडून तरूणी ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलटेस्वार तरूणाने पायी चाललेल्या तरूणीला धडक दिल्यामुळे ती बसच्या चाकाखाली सापडून ठार झाल्याची धक्कादायक घटना 17 एप्रिलला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कसबा गणपती प्रवेशद्वाराजवळ घडली.

शितल बाळासाहेब पवार ( वय 25 ) असे ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी बुलेटस्वार इम्रान ऐजाज शेख याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. तरूणीचा मित्र चेतन कोकरे (वय २५) याने फिर्याद दिली आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शितल पवार एका खासगी रूग्णालयात शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी सातच्या सुमारास शितल खरेदीसाठी कसबा पेठ परिसरात आली होती. मंदीर प्रवेशद्वाराजवळ ती पायी चालली असताना भरधाव वेगात आलेल्या इम्रानने तिला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने शितल बसच्या चाकाखाली सापडली. गंभीररित्या जखमी झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरूणीच्या मृत्युला कारणीभूत ठरल्याप्रकरणी बुलेटस्वाराला अटक करण्यात आली आहे.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार

पुणे-भरधाव मोटारचालकाने दुचाकीस्वार तरूणाला पाठीमागून धडक दिल्यामुळे त्यांच्यामागे बसलेली महिला खाली पडून ठार झाली. हा अपघात 18 एप्रिलला सकाळी पावणेआठच्या सुमारास पिसोळीतील धर्मावंत पेट्रोलपंपासमोर घडला. सुनंदा रमेश विचारे (वय 56) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नवनाथ विचारे (वय 27) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.