
चीनमधून आलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये थैमान घालायला सुरुवात केली आहे. रोज 20 हजारांहून अधिक रुग्ण दाखल होत आहेत. शांघायसह चीनच्या 44 शहरांत अनेक दिवसांपासून कडक लॉक डाऊन सुरू आहे. त्याच वेळी हिंदुस्थानातही पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने उसळी घेत आहे. कोरोनाच्या तीन लाटांनी आपल्याला आधीच खूप पोळले आहे. देशवासीयांनी खूप सोसले आहे. त्यामुळे चौथी लाट दारात रोखायची तर ताकही फुंकूनच प्यावे लागेल!
कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे असे वाटत असतानाच कोविडच्या विषाणूची वळवळ पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने महाराष्ट्रासह देशभरातच कोरोनाचे तमाम निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले होते. आतापर्यंत झालेले 187 कोटी डोसेसचे लसीकरण आणि त्यातून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी तयार झालेली पुरेशी रोगप्रतिबंधक क्षमता यामुळे कोरोना फिरून परत येणार नाही आणि आलाच तरी फार हानी करणार नाही, असे मत जाणकार मंडळी व्यक्त करीत होती. मात्र काही महिन्यांचा ब्रेक घेऊन कोविडच्या विषाणूने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. 19 आणि 20 एप्रिल या दोन दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ पाहायला मिळाली. लागोपाठ दोन दिवस 24 तासांत 2 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा धास्तावल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी देशभरात 24 तासांमध्ये 1 हजार 247 रुग्ण आढळले होते. मात्र, बुधवारी रुग्णांचा हा आकडा अचानक 2 हजार 67 वर पोहचला. म्हणजे 24 तासांत कोरोनाबाधितांची संख्या जवळपास दुपटीने वाढली. गुरुवारीदेखील रुग्णसंख्येत याच गतीने वाढ होऊन 24 तासांत 2 हजार 380 रुग्णांची नोंद झाली. मावळत्या आठवडय़ात कोविडबाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट 0.43 टक्के इतका असताना गुरुवारी मात्र पॉझिटिव्हिटीने उसळी घेऊन तो रेट 0.53 टक्क्यांवर पोहचला. देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात
कोविडच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ
लक्षणीय आहे. 11 ते 18 एप्रिल या आठ दिवसांत दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या तिपटीने वाढली. दिल्लीत केवळ रुग्णसंख्याच वाढती आहे असे नाही, तर संसर्ग दरही 5.7 टक्क्यांवर पोचला आहे. देशभराचा विचार करता 12 एप्रिल रोजी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 0.21 टक्के होता आणि 20 एप्रिल रोजी म्हणजे आठवडाभरातच तो दुपटीहून अधिक वाढला. कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण दुपटीवर जाणे हे केंद्र सरकार आणि देशभरातील तमाम राज्य सरकारांची चिंता वाढवणारे आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेत प्राणहानी कमी झाली असली तरी आधीच्या दोन आणि तिसऱया लाटेने देशाचे आर्थिक गणित पुरते कोलमडून टाकले आहे. हळूहळू अर्थव्यवस्थेची गती पूर्वपदावर येईल असे वाटत असतानाच आता कोरोनाची चौथी लाट पुन्हा दारावर धडका देत आहे. कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग किती तीक्र किंवा सौम्य आहे हे त्याच्या ‘आर व्हॅल्यू’मधून स्पष्ट होते. कोविडच्या तिसऱया लाटेत कोरोनाची आर व्हॅल्यू 1.28 टक्के इतकी होती म्हणून कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढली. आताही तशीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. 11 एप्रिल रोजी संपलेल्या आठवडय़ात कोरोनाची आर व्हॅल्यू 0.93 टक्के होती. 18 एप्रिल रोजी संपलेल्या आठवडय़ात विषाणू अधिक सशक्त झाला आणि आर व्हॅल्यू 1.07 टक्क्यांवर पोहचली. आर व्हॅल्यू 1 टक्क्याहून अधिक होणे म्हणजेच
अधिकाधिक लोकांना
विषाणूचा संसर्ग होण्याची आणि नव्या लाटेची भीती. दुर्दैवाने दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांत वाढणारी रुग्णसंख्या त्याच धोक्याचा इशारा देत आहे. कोरोनाबाधितांची वेगाने वाढणारी संख्या पाहून केंद्र सरकारने बुधवारी दिल्ली, हरयाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मिझोराम या पाच राज्यांना पत्र लिहून कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमांचे पालन व आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना केली आहे. मधल्या काळात कोरोना आटोक्यात आल्याची चिन्हे दिसत असल्याने मास्क सक्तीसह सर्वच निर्बंध हटविण्यात आले होते. तथापि केंद्र सरकारच्या सूचनेनंतर दिल्ली, उत्तर प्रदेश व पंजाब सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती लागू केली आहे. कोरोनाचे झपाटय़ाने होणारे संक्रमण रोखण्यासाठी मास्कचा वापर उपयुक्त असल्याचे यापूर्वीच्या तिन्ही लाटांत सिद्ध झाले आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या लाटेला आळा घालायचा तर मास्कचा वापर अनिवार्य करणे हाच पहिला पर्याय असू शकतो. चीनमधून आलेल्या कोविडच्या विषाणूने पुन्हा एकदा चीनमध्ये थैमान घालायला सुरुवात केली आहे. रोज 20 हजारांहून अधिक रुग्ण दाखल होत आहेत. शांघायसह चीनच्या 44 शहरांत अनेक दिवसांपासून कडक लॉक डाऊन सुरू आहे. त्याच वेळी हिंदुस्थानातही पुन्हा एकदा कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीने उसळी घेत आहे. कोरोनाच्या तीन लाटांनी आपल्याला आधीच खूप पोळले आहे. देशवासीयांनी खूप सोसले आहे. त्यामुळे चौथी लाट दारात रोखायची तर ताकही फुंकूनच प्यावे लागेल!



























































