
>> स्पायडरमॅन
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडन’ यांनी सर्व खासगी अमेरिकन कंपन्या आणि संस्थांना आपल्या डिजिटल डाटाची सुरक्षा अजून कडक करण्याविषयी तसेच अधिक सावधगिरी बाळगण्याविषयी सूचना केली होती. सुरक्षा यंत्रणांकडून रशिया लवकरच अमेरिकेवर सायबर हल्ला करणार असल्याची सूचना त्यांना मिळाली होती.
ब्रिटनच्या सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांनीदेखील त्या वेळी बायडन यांच्या सूचनेचे समर्थन केले होते. अर्थात यासंदर्भातला कोणताही पुरावा मात्र दोघांना समोर आणता आला नव्हता. बायडन यांनी दिलेली ही सूचना पुन्हा एकदा चर्चेत आलेली असताना, रशियाने आजवर केलेल्या तीन सर्वात संहारक अशा सायबर हल्ल्यांचीदेखील चर्चा मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियामध्ये होत आहे. जगाने धसका घेतलेले असे हे हल्ले होते तरी कोणते? युक्रेन हे तर कायमच रशियाचे ‘गिनिपिग’ राहिलेले आहे. आपल्या नव्या आणि घातक ‘सायबर टूल’ची चाचणी करण्यासाठी रशिया युक्रेनलाच शिकार बनवते असे जगभरातील अनेक सायबर तज्ञांचे मत आहे.
2015 मध्ये ‘ब्लॅक एनर्जी’ नावाने झालेल्या सायबर हल्ल्यात युक्रेनची इलेक्ट्रिसिटी ग्रिड पूर्ण खराब झाली होती आणि पश्चिम युक्रेनमधील युटिलिटी कंपनीच्या तब्बल 80 हजार ग्राहकांना ‘ब्लॅक आऊट’ला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी अमेरिका आणि युरोपियन युनियनने हा हल्ला रशियन सैन्याच्या हॅकर्सने केल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर पुन्हा वर्षभरात झालेल्या ‘इंडस्ट्रोयर’ सायबर हल्ल्याने युक्रेनची राजधानी ‘किव’मधील एक मोठा भाग पूर्णपणे अंधारात बुडाला. तर आजवरच्या सर्वात घातक मानला गेलेल्या ‘नॉटपेटय़ा’ सायबर हल्ल्याने युक्रेनसह जगभरातील हजारो कंपन्यांची संगणक प्रणाली पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती आणि 10 अरब डॉलर्स इतके प्रचंड मोठे नुकसानदेखील झाले होते. अर्थात, रशियाने कायमच या सर्व आरोपांना झिडकारून टाकले आहे आणि आपला यात काही सहभाग नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. अमेरिका व युरोप राष्ट्रांच्या या आरोपांना आणि भीतीला रशियाने विनोदाने ‘रुसोफोबिया’ असे नावदेखील दिले आहे.



























































