
पैशाच्या लोभापायी लहान मुलांचे अपहरण होत असल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकत असतो, पण चक्क एका माकडाने 3 वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचे वृत्त सीसीटीव्ही फुटेजमुळे उघड झाले आहे.
चीनमधील चोंगकिंग शहरात ही घटना घडली आहे. येथे एक 3 वर्षाची मुलगी रस्त्यावर खेळत होती. अचानक तिथे एक माकड येतं आणि ते तिला पकडून ओढून नेण्याचा प्रयत्न करतं. यावेळी या माकडाने चिमुकलीवर हल्ला केल्यामुळे ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. ही घटना 19 एप्रिलला घडली आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्यामुळे या घटनेचा शोध लागला. यामध्ये माकडाने या मुलीवर हल्ला केल्यामुळे तिला दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावर जखमाही दिसत आहेत.
माकड हल्ला लहानग्या मुलीवर हल्ला करून तिचे अपहरण करत असल्याचा प्रसंग लियु नावाच्या व्यक्तिने बघितला. त्याने या चिमुकलीला माकडाच्या तावडीतून सोडवलं.
लियू यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी की, एका मुलीच्या रडण्या आणि ओरडण्याचा मला आवाज आला. त्यामुळे मी घटनास्थळी दाव सुटलो. तेव्हा पाहिले की, एक माकड तिला घेऊन जात होते. या छोट्या मुलीची मी माकडाच्या तावडीतून सुटका केली.
चोंगकिंग शहराजवळच्या डोंगरावर माकडांची वस्ती आहे, मात्र त्यांची संख्या किती आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. आम्ही जंगली माकडांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून लोकांना या माकडांपासून कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता प्रयत्न सुरू आहेत. याकरिता गावातील परिसरात गस्त वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.




























































