इंटरनेटवर सगळं फुकट?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अतुल कहाते

सध्याच्या डिजिटल युगात बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क आणि कॉपीराइटचा मुद्दा कठीण झाला आहे. प्रचंड खर्च करून निर्मिलेले चित्रपट, दूरचित्रवाणीसाठी तयार केलेले कार्यक्रम, संगीत, पुस्तकं हे सगळं इंटरनेटमुळे हे एकीकडून दुसरीकडे फुकटात शेअर केलं जातं. व्हॉट्सऍप, फेसबुक यांच्यासारखी माध्यमं तर इंटरनेटवरचा सगळा मजकूर अगदी सहजपणे शेअर करण्यासाठी अत्यंत आदर्श ठरली आहेत. इंटरनेटवरचा कुठलाही मजकूर आपण ‘कॉपी-पेस्ट’ करू शकतो असं सगळय़ांना वाटतं. ही कायद्याच्या दृष्टीनं चोरी असते याचीही तमा बाळगली जात नाही.

जो माणूस एखादा शोध लावतो त्याचा त्या शोधावर किती आणि किती काळ हक्क असला पाहिजे हा कळीचा मुद्दा आहे. तसंच या हक्काचं ‘मोजमाप’ आर्थिक भाषेमध्ये करणं शक्य आहे का, हा त्यामधला दुसरा मुद्दा आहे. मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी या महान शास्त्रज्ञांनी स्वतःला कर्करोगाच्या छायेत लोटलं जाण्याच्या शक्यतेकडे दुर्लक्ष करून नवी मूलद्रव्यं शोधली. त्यानंतर याचं श्रेय तसंच त्यासाठीचा आर्थिक मोबदला हे सगळं जेव्हा त्यांना देण्याचा मुद्दा निघाला तेव्हा अत्यंत प्रांजळपणे हे सगळं जगासाठी असल्याचं या जोडप्यानं सांगून टाकलं. भयाण गरिबीत बालपण घालवूनही मेरी क्यूरीला आपल्या संशोधनातून आर्थिक लखलाभ करून घ्यावासा वाटू नये हा उदार दृष्टिकोन, बौद्धिक संपदेच्या चष्म्यातून वेडपटपणाचा वाटू शकेल, पण अशा वेडेपणातूनच जग बदलणाऱया अनेक गोष्टी घडलेल्या आहेत हे नमूद करावंसं वाटतं.

अर्थातच हा अत्यंत उदात्त दृष्टिकोन झाला. आपण केलेल्या कामाचं रास्त मोल आपल्याला मिळण्याची अपेक्षा कुणी ठेवणं अजिबातच गैर नाही. आताचं युग डिजिटल असल्यामुळे बौद्धिक संपदेचा मुद्दा अजूनच कठीण झाला आहे. प्रचंड खर्च करून निर्मिलेले चित्रपट, दूरचित्रवाणीसाठी जीव ओतून तयार केलेले कार्यक्रम, संगीत, पुस्तकं हे सगळं लोकांना फुकट हवं असतं. इंटरनेटमुळे हे एकीकडून दुसरीकडे शेअर करणंही अतिशय सोपं झालं आहे. बेदिक्कतपणे ही चोरी राजरोसपणे सुरू असते. मूळ कलाकार, तंत्रज्ञ आणि या सगळ्याशी संबंधित असलेले असंख्य लोक यांची रोजीरोटी त्यातून मिळणाऱया उत्पन्नावर अवलंबून असते याची फिकीरही कुणाला करावीशी वाटत नाही.

इंटरनेटवरचा कुठलाही मजकूर आपण ‘कॉपी-पेस्ट’ करू शकतो असं सगळय़ांना वाटतं. ही कायद्याच्या दृष्टीनं चोरी असते याचीही तमा बाळगली जात नाही. अगदी सहजपणे अशा प्रकारे मजकूर, छायाचित्रं, चित्रफिती यांचा प्रसार सुरू असतो. अलीकडच्या काळात छापील पुस्तकांऐवजी डिजिटल पुस्तकं वाचण्यावर लोकांचा भर असतो असं म्हटलं जातं. यात तथ्य असलं तरी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही पुस्तकं शक्यतो विकत घ्यायला नकोत यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू असतात. म्हणजेच शक्यतो पुस्तकाची फुकट पीडीएफ मिळाली तर ती सगळ्यांना हवी असते. शिवाय आपण अशी अपेक्षा करणं साफ चुकीचं आहे याचीही कुणाला फारशी जाणीव नसते. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. समजा एखादा डॉक्टर किंवा इंजिनीअर किंवा अगदी एखादा दुकानदार आपल्या ग्राहकांना हवं ते फुकटात देईल का? आपणसुद्धा अशी अपेक्षा कुणी ठेवणं साफ चुकीचं असल्याचं मान्य करू. अशा वेळी प्रचंड कष्ट घेऊन आणि पैसे ओतून लेखक, प्रकाशक, वितरक वगैरे सगळ्या मंडळींनी तयार केलेलं एखादं पुस्तक बेलाशकपणे इंटरनेटवर पीडीएफच्या माध्यमातून फिरत असताना त्या सगळ्या लोकांना याविषयी काय वाटत असेल याचा विचार आपल्या मनात येतो का?

परदेशामध्ये स्वामित्व हक्काचा म्हणजेच कॉपीराइटचा मुद्दा बऱयापैकी गांभीर्यानं घेतला जातो. तिथे याविषयीचे कायदे तर कडक आहेतच; पण त्यांची अंमलबजावणीसुद्धा अगदी कठोरपणे केली जाते. साहजिकच अशा प्रकारे चोरी करणाऱया लोकांना चांगला चाप बसतो. तसंच अशा कृती करण्यापूर्वी लोक नीट विचार करतात. आपल्याकडे मात्र इंटरनेटवर काही अवतरलं की त्यावर आपला मालकी हक्क असल्याचीच भावना लोकांच्या मनात असते. स्वाभाविकपणे आपण कायदा मोडून मजकूर, गाणी, छायाचित्रं, ध्वनिमुद्रण, चित्रफिती इंटरनेटवर टाकत आहोत किंवा अशा प्रकारे टाकलेल्या गोष्टी वापरत तसंच प्रसारित करत आहोत याविषयी बव्हंशी लोकांना काहीही वाटत नाही. याचं कारण म्हणजे हा प्रकार इतक्या मोठय़ा प्रमाणावर होतो की, त्यासाठी गुन्हा दाखल करणंच अवघड होऊन बसतं. मराठी प्रकाशकांना पीडीएफच्या स्वरूपात तसंच बनावट म्हणजे पायरेटेड प्रकारे पुस्तकं उपलब्ध करून देणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी नाकीनऊ येतात, हे आपल्यासमोरचं उदाहरण आहे.

व्हॉट्सऍप, फेसबुक यांच्यासारखी माध्यमं तर इंटरनेटवरचा सगळा मजकूर अगदी सहजपणे शेअर करण्यासाठी अत्यंत आदर्श आहेत. दिवसभरात अशा प्रकारे असंख्य लोक अक्षरशः शेकडो गोष्टी फॉरवर्ड आणि शेअर करत असतात. व्हॉट्सऍप विद्यापीठाची निर्मितीही याच कारणामुळे राजकारणी लोकांच्या दृष्टीनं अतिशय सोयीची आहे. खोटे, द्वेषमूलक संदेश फिरवत राहणं यामुळे त्यांना शक्य होतं. तो वेगळा विषय असला तरी त्याचीही मुळं इंटरनेटवरचं कुणीही, कसंही कॉपी-पेस्ट करू शकतं या आत्मविश्वासापोटीच ते घडू शकतं. इथे फक्त जाणूनबुजून खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर फिरतो, एवढंच.

काही लोकांना आपण अशा प्रकारे इंटरनेटवरचं सगळं फुकट असल्यासारखं वापरणं आणि जे फुकट नाही तेही फुकट असल्यासारखं इंटरनेटवर टाकणं चुकीचं असल्याची जाणीवही असते. तरीसुद्धा इतर सगळेच लोक तसं करतात आणि शिवाय आपण चुकीचं वागलो तरी त्याची आपल्याला काहीच शिक्षा होणार नाही या गोष्टींची जाणीव असणं यामुळे तेही याला सरावतात.

इंटरनेटवर काही मजकूर फुकट वापरण्याजोगा असला तर त्यासाठीची स्पष्ट नोंद तिथे असते. उदाहरणार्थ आपण गुगल ईमेजेसचा वापर करून चित्रांचा शोध घेत असला तर त्यापैकी कुठली चित्रं आपल्याला स्वामित्व हक्कांचा भंग न करता वापरता येऊ शकतात याचा अगदी उघड उल्लेख असतो. तसंच कुठली चित्रं आपण मूळ मालकाला रास्त भरपाई दिल्याशिवाय वापरू शकत नाही हेही सांगितलेलं असतं. याची दखल घेऊन त्यानुसार मोफत वापरण्याजोगीच चित्रं वापरण्याची खबरदारी घेणारे लोक अगदी मोजके असतात. याउलट अगदी आनंदानं आपल्याला आवडतील ती चित्रं बेदिक्कतपणे वापरणाऱया लोकांची संख्याच खूप जास्त असते. म्हणूनच या सगळ्याविषयी जरा विचार तरी करूया.
[email protected]