
मुलाखत – पूजा सामंत
प्रसिद्ध हिंदुस्थानी लेखक अमिष त्रिपाठी यांनी रामायण, महाभारत, शिव पुराण अशा प्राचीन धर्मग्रंथांवर पुस्तकं नव्हेत तर पुस्तकांची अखंड मालिका लिहीत जगभर ‘बेस्ट सेलर’ म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. 7 एप्रिलपासून डिस्कव्हरी प्लस या वाहिनीवर त्यांच्या ‘लिजेंड्स ऑफ द रामायण विथ अमिष’ या शोमध्ये त्यांनी स्वतः ओटीटीवर होस्ट व स्टोरी टेलर म्हणून पदार्पण केले आहे. यानिमित्ताने अमिष त्रिपाठी यांच्याशी केलेली बातचीत…
अमिष, पुन्हा एकदा रामायण – काय नवे असणार आहे या शोमध्ये?
– ‘लिजेंड्स ऑफ द रामायणा विथ अमिष’ याचे शूटिंग श्रीलंका, अयोध्या, नाशिक आणि हंपी अशा विविध ठिकाणी झाले आहे आणि ते या महाकाव्याशी संबंधित फारशा माहिती नसलेल्या अनेक गूढ गोष्टी समोर आणणार आहे. माझ्यासाठी हा शो भावनिक आणि अध्यात्मिक अनुभव असे म्हटले आहे.
प्रेक्षकांसाठी या कार्यक्रमात नेमकं काय नवं मांडणार आहात?
– तुम्हाला माहिती आहे का, श्रीरामांना एक मोठी बहीण होती? कैकयीने श्रीरामांना 14 वर्षांच्याच वनवासासाठी का पाठवले? नाशिक शहराला ते नाव कसे मिळाले? श्रीराम आणि गौतम बुद्ध यांना जोडणारा समान धागा तुम्हाला माहिती आहे का? अनेक शतकांपासून रामायणाने हिंदुस्थानातील सर्वात नावाजलेला ग्रंथ- इतिहास म्हणून मान्यता मिळवली आहे. संपूर्ण देशाच्या जनमानसाला त्याने आकार दिला आहे, परंतु आपल्या संस्कृतीत इतके खोलवर रुजलेले असूनही रामायणाबद्दल अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या लोकांना ज्ञात नाहीत. म्हणूनच जेव्हा डिस्कव्हरी प्लसने या शोची संकल्पना माझ्यासमोर मांडली मी होकार दिला. खरं म्हणजे या शोला डॉक्युमेंटरीचे स्वरूप आहे असं म्हणावे लागेल. 5 हजार किमीचा प्रवास या मालिकेत सादर होतोय.
हिंदुस्थानी मनाचा पिढय़ान्पिढय़ा ठाव घेतलेल्या रामायणावर संशोधन करण्यासाठी तुमचा आधार कोणता?
– माझ्या या या प्रवासामध्ये यतींद्र मिश्र (अयोध्याचे राजपुत्र), कविता काणे (लेखिका), पुरस्कार विजेते जल-भूगोलशास्त्रज्ञ रितेश आर्या, सुनेला जयवर्देने (पर्यावरण वास्तुविशारद व लेखिका), कृष्ण देवराया, विजयनगर साम्राज्याचे वंशज, शशी धनतुंगे, श्रीलंकन सिव्हिल एव्हिएशन ऑथोरिटीचे माजी अध्यक्ष आणि इतर अनेक सहकारी यांनी अमूल्य संदर्भ दिले. ही मालिका शूट करणे सोपे नव्हते. हिंदुस्थान आणि श्रीलंकेतील अनेक स्थळी यांचे चित्रण केले गेले आहे. वाईड अँगल फिल्म्सची निर्मिती असलेली ही मालिका सुजाता कुलश्रेष्ठ आणि अभिमन्यू तिवारी यांनी सहदिग्दर्शित केली आहे आणि आम्ही त्याच वाटेवर गेलो जिथे अनेक हजारो वर्षांपूर्वी आपले श्रीराम स्वतः चालत गेले होते.
या मालिकेच्या संकल्पनांचा केंद्रबिंदू हिंदुस्थानी पुराणे आहेत आणि तरीही ती मोठय़ा प्रमाणात समोर न आलेली अनेक तथ्यं आहेत. सर्व कालखंडांमधील दर्शकांना रामायण जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, आजही आकर्षित करते. या महाकाव्यावर अनेक कलाकृती आल्या असल्या तरी, डिस्कव्हरी प्लसमध्ये आम्ही अधिक विस्तृत जाण्याची संधी घेतली व कमी माहिती असलेल्या मनोरंजक गोष्टी आमच्या दर्शकांसाठी समोर आणण्याचे ठरवले.
‘जगभर स्वतःला ग्लोबल लेखक म्हणवताना हिंदुत्व विचारधारा लपवण्याकडे लेखकांचा कल दिसतो. तुम्ही मात्र ‘बेस्ट सेलर’ ठरलात हिंदू लेखक म्हणून!’
– मी स्वतःला हिंदू लेखक म्हणवून घेतो याचा मला अभिमान आहे. त्याबाबत माझ्यावर टीका झाली असेलही, पण मला त्याची पर्वा नाही. प्रभू रामचंद्र आणि शिवजी (शिवाज ट्रायालॉजी) चे आशीर्वाद माझ्यावर आहेत. मी हिंदुस्थानी पुराण, वेद, धर्मग्रंथ यावर संशोधन, लिखाण करत राहणार आणि त्यावर माझ्या कलाकृती नवा दृष्टिकोन घेऊन येत राहणार हे नक्की.’
‘रामचंद्र सीरिजवर एव्हाना तुमच्या पुस्तकांची मोठी शृंखला झालीये. हे राम प्रेम, धार्मिक ग्रंथाविषयी कधी आपलेपणा वाटू लागला?’
– मला हे आठवतही नाही. माझे आजोबा पंडित होते, त्यांना अखंड रामायण तोंडपाठ असे. काशी विद्यापीठात ते गणित आणि भौतिकशास्त्रदेखील शिकवत असत. आमच्या घरात वातावरण धार्मिक आणि तरीही उदारमतवादी होतं. अशा दोन्ही मिश्र संस्कृतींचा मिलाफ माझ्या जडणघडणीवर झाला. मी डाव्या विचारसरणीचा नाही, पण महिलांना समान अधिकार, सन्मान मिळावा यासाठी मी आग्रही आहे. आमच्या आजोबांना एकूण 8 अपत्यं. त्यात 5 मुली आणि 3 मुलं. त्या काळात मुलींना शिक्षण देण्याची पद्धत नव्हती, पण आता 92 वर्षीय असलेली माझी आत्या तिच्या विद्यापीठातील पहिली महिला डॉक्टर होती. आमच्या घरातील समस्त महिला वर्ग उच्च विद्याविभूषित होता. आध्यात्मिक, धार्मिक, पौराणिक अशा वातावरणात शिक्षण घेतल्याने तसे संस्कार माझ्यावर घडलेत जे लेखनात उतरलेत.
नवं काय करताय?
– निर्माता बनलोय… स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बरेच काही प्रयोग करतोय. शेखर कपूर आणि सुपर्ण वर्मा यांसोबत माझी शिवा ट्रायालॉजीवर फिल्म सुरू झालीये. 2022-2023 लिखाणासोबत हेदेखील नवे दालन माझ्यासाठी असेल. माझे रामायण – राम, सीता, हनुमान यावरचे प्रेम तसूभर कमी होणार नाही, जे चंद्रकलेप्रमाणे वाढत जाईल. कारण माझ्या यशात शिवजी आणि रामजी यांचा वरद हस्त आहे.





























































