
नगर शहरासह तालुक्यात आणि जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी (दि.22) रात्री वादळी वाऱयासह झालेल्या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱयांची शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली होती. वादळाने अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला होता. काही ठिकाणी पावसामुळे कांदा भिजल्याने शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
चार दिवस पावसाचे वातावरण राहील, असा इशारा हवामान विभागाने तीन दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानुसार वातावरणातील उष्मा वाढला होता. तसेच, वातावरणात अचानक बदलही दिसून येत होता. मात्र, मागील दोन दिवसांत नगर शहरातील काही परिसर वगळता कुठेही फारसा पाऊस झाला नव्हता. बोल्हेगाव, एमआयडीसी परिसरात गुरुवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या होत्या. शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत होता.
शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पारनेर, श्रीगोंदा, नेवासा आदी तालुक्यांमध्ये काहीसे ढगाळ वातावरण झाले होते. त्यानंतर अचानक सोसाटय़ाचा वारा सुटला. विजांचा कडकडाटही सुरू झाला. वारा इतका वेगात होता की सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते. रात्री आठ ते दहाच्या सुमारास पारनेर तालुक्यातील कजुर्ले हर्या गावासह परिसरात विजांच्या कडकटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱयांची कांदा झाकण्यासाठी धावपळ सुरू झाली होती. वातावरण बदलामुळे काही भागांत शेतकऱयांनी कांदा झाकण्यासाठी प्लॅस्टिक कागद खरेदीसाठी दिवसभर दुकानांमध्ये गर्दी केली होती. तसेच, नगर शहर परिसरातही रात्री नऊच्या नंतर जोरदार वाऱयासह विजांच्या कडकटात अवकाळी पाऊस झाला असून, काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
पारनेर तालुक्यात वीज पडून तीन गायी दगावल्या
पारनेर तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात शुक्रवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस पडला. पावसाचे प्रमाण जरी अल्प असले तरी पळसी येथील लताबाई भोरू वाघ यांच्या तीन गायी वीज पडल्याने ददगावल्या आहेत. याबाबत पारनेरचे तहसीलदार अवळकंठे व स्थानिक कामगार तलाठी जाधव यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, वडझिरे, भाळवणी परिसरात पॉइंट दोन ते तीन मिमी पाऊस झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले आहे.
अनेक भागांत वीजपुरवठा खंडित
अगोदरच कोणत्याही वेळी विजेचे भारनियम सुरू आहे. त्यातच रात्री विजांचा कडकडाट व सोसाटय़ाचा वारा सुरू होताच, नगर शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य भागात अचानक वीज गायब झाली होती. मात्र, या वादळामुळे महावितरण कंपनीचे फारसे नुकसान झाले नसल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांनी सांगितले.
नऊ तालुक्यांत पावसाची हजेरी
जिल्ह्यात 9 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. नगर शहर व परिसरात असलेल्या नालेगाव मंडलात 5.3 मिमी, सावेडी मंडलात 0.8, कापूरवाडी 1.5, केडगाव 1.8, भिंगार 2.3, जेऊर 1.8, चिचोंडी-पाटील 1.3, वाळकी 0.5, चास 1, रुईछत्तीशी 1.3 असा नगर तालुक्यात सरासरी 1.6 मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय पारनेर 0.4, श्रीगोंदा 3, कर्जत 2, जामखेड 0.7, पाथर्डी 1.3, नेवासा 0.3, राहुरी 0.4, अकोले 3 मि.मी पाऊस झाला आहे.























































