मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर दरीत कोसळून बालकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मधमाश्यांनी हल्ला केल्यानंतर जीव वाचविण्यासाठी पळताना कडय़ावरून 300 फूट खोल दरीत कोसळून 13 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य काहीजण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास सातारा तालुक्यातील शेरेवाडीजवळील शिरोबाच्या डोंगरावर घडली आहे.

सोमेश्वर विलास कदम (रा. तारळे, ता. पाटण) असे मृत मुलाचे नाव आहे. तर, मधमाश्यांच्या हल्ल्यात गौरव लावंघरे (वय 16), जय लावंघरे (वय 14), तानाजी धनवडे (वय 72), स्वरूप धनवडे (वय 19), प्रणय धनवडे (वय 24), संदेश धनवडे (वय 22), राजेश पवार (वय 45), शुभम धनवडे (वय 24), गणेश बाकले (वय 25), ऋषी धनवडे (वय 25) हे जखमी झाले आहेत.

सोमेश्वर हा शेरेवाडी येथे आपल्या मामाकडे काही दिवसांपूर्वी आला होता. रविवारी सकाळी तो मामासोबत शिरोबाच्या डोंगरावर जत्रेला गेला होता. त्यावेळी मधाचे पोळे उठले. मधमाश्यांनी अचानक तेथील लोकांवर हल्ला चढविला. जीव वाचविण्यासाठी सर्वजण सैरावैरा पळू लागले. यावेळी डोंगराच्या कडय़ावरून पाय घसरल्याने सोमेश्वर 300 फूट खाली कोसळला.

हा प्रकार गावातील काही लोकांना समजल्यानंतर त्यांनी डोंगराकडे धाव घेतली. मात्र, कडा खोल असल्यामुळे त्यांना खाली उतरता आले नाही. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार, देवेंद्र गुरव, आदित्य पवार, सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह शेरेवाडीचे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या सर्वांनी दरीत उतरून सोमेश्वरचा मृतदेह दरीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.