नांदेडचे भरत जेठवाणी बनले सान्वी जेठवाणी…लिंगबदल शस्त्रक्रियेने मिळवली नवी ओळख!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील कलावंत तथा नृत्य दिग्दर्शक डॉ. भरत जेठवाणी यांनी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून नवीन ओळख मिळवली आहे. याबाबतची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शस्त्रक्रियेनंतर त्या आता सान्वी जेठवाणी म्हणून ओळखल्या जाणार आहेत.

याबाबत त्या बोलताना म्हणाल्या की, लहानपणापासून आपण स्त्री असल्याचे समज असणाऱ्या व्यक्ती असतात, अशा व्यक्तींसाठी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करून स्त्रीरुप मिळवता येते. त्यामुळे मनाची घुसमट होत नाही. ही शस्त्रक्रिया देशात होत असल्याचे समजल्यावर डॉ. जेठवानी यांनी हा धाडसी निर्णय घेत स्त्रीरूप मिळवले आहे. जेठवाणी यांची नवीन ओळख म्हणून त्यांनी सान्वी जेठवाणी असे नाव घेतले आहे. ही शस्त्रक्रिया जटील असून त्यासाठी विविध चाचण्यांमधून रुग्णाला जावे लागते. तसेच मानव रोगतज्ञापासून ते प्लास्टिक सर्जनपर्यंतची ही मोठी प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.

हक्काचे संरक्षण 2019 च्या कायद्यानुसार विविध हक्क अशा व्यक्तींना मिळत आहेत. जेठवाणी यांनी दिल्ली येथील ऑलमॅक या खाजगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली. हा प्रवास कठोर होता. मात्र, मनासारखे रुप मिळाल्याने समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. माणसाची ओळख चारित्र्याने व आत्म्याने होत असते. त्यामुळे लिंग स्त्री असो किंवा पुरुष असो माणसाची ओळख माणुसकीने झाली पाहिजे, असे जेठवाणी यांनी केले. लहानपणापासून मनात असलेल्या एका स्त्रीला आता समाजातही स्थान मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाज व मित्रमंडळीने प्रोत्साहन दिल्यामुळे हा धाडसी निर्णय घेता आला, या पुढेही ते सहकार्य करून साथ देतील, अशी आशा असल्याचे ते म्हणाले. जेठवाणी यांनी उच्चशिक्षित असून नांदेडला सांस्कृतिक क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे आणि हे कार्य आयुष्यभर सुरू राहणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

समाजातील स्त्री-पुरुष भेदभाव मिटवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माणसाची ओळख माणूस म्हणून राहिली पाहिजे, यासाठी आपण कार्यरत राहू, असेही त्या म्हणाल्या. मनातील स्त्रीला समाजात स्थान देण्यासाठी त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला असून जेठवाणी हे नांदेडचे पहिले लिंगपरिवर्तन श्सत्रक्रिया करून नवीन ओळख मिळवणारे व्यक्ती ठरले आहेत.